असे आहे श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया मालिकेचे वेळापत्रक


नवी दिल्ली – पुढच्या महिन्यात भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका दौरा करणार आहे. उभय संघात या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. दरम्यान या मालिकेचे वेळापत्रक नुकतेच समोर आले आहे. टीम इंडिया १३ जुलै ते २५ जुलै या दरम्यान श्रीलंका दौऱ्यावर असेल. कोरोनाचे संकट पाहता सर्व सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील.

सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारताचे श्रीलंकेसोबतचे सामने पाहता येणार आहेत. भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर असून श्रीलंका दौऱ्यासाठी नवीन आणि युवा खेळाडूंचा संघ पाठवला जाणार आहे. या दौऱ्यासाठी शिखर धवनच्या हातात भारतीय संघाची कमान असू शकते. शिवाय, मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवच्या कामगिकरीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत सूर्यकुमारने पदार्पण करत आपल्या गुणांची चुणूक दाखवली होती.

काही नवीन खेळाडूंनाही या दौऱ्यासाठी संधी मिळू शकते. यात चेतन साकारिया, हर्षल पटेल, देवदत्त पडिक्कल, नितीश राणा यांना भारतीय संघात स्थान मिळू शकते. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेला समोर ठेऊन निवडकर्ते या दौऱ्यावर आणि खेळाडूंकडे लक्ष ठेवणार आहेत.

श्रीलंका दौरा सुरु असताना भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. भारताला १८ ते २२ जून दरम्यान साऊथम्पटन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिकाही त्यांना इंग्लंडमध्ये खेळायची आहे.

असे आहे श्रीलंका दौऱ्याचे वेळापत्रक

एकदिवसीय मालिका –

  • १३ जुलै – पहिला एकदिवसीय सामना
  • १६ जुलै – दुसरा एकदिवसीय सामना
  • १८ जुलै – तिसरा एकदिवसीय सामना

टी-२० मालिका –

  • २१ जुलै – पहिला टी-२० सामना
  • २३ जुलै – दुसरा टी-२० सामना
  • २५ जुलै – तिसरा टी-२० सामना