नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाकडून रद्द


मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना चांगलाच धक्का दिला आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र हे खोटे असल्याचे समोर आल्यामुळे उच्च न्यायालयाने हे प्रमाणपत्र रद्द केले आहे. तसेच, नवनीत राणांना उच्च न्यायालयाने 2 लाखांचा दंड ठोठावला आहे.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र खोटे असल्याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. आज दिनांक 8 जून रोजी सदर दाव्याचा निकाल घोषित करण्यात आला. दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण सन्मान करतो, पण आपण या निकालाविरुद्धात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे नवनीत राणा यांनी एनएआयला सांगितले.

हा घटनेवरील घोटाळा असल्याचे मत उच्च न्यायालयाने नोंदवून सदर जात प्रमाणपत्र रद्द करुन नवनीत राणा यांना 2 लाखाचा दंड ठोठावला आहे. तसेच सदरचे खोटे जात प्रमाणपत्र 6 आठवड्याच्या आत शासनाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने अॅड.सी.एम्.कोरडे, अॅड.प्रमोद पाटील व अॅड.सचिन थोरात यांनी बाजू मांडली. जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे नवनीत राणा यांना मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.