मोदी सरकारवर टीका करताना झालेल्या चुकीबद्दल आता चिदंबरम यांनीच केला खुलासा


नवी दिल्ली – विरोधक मोदी सरकारच्या लसीकरणाच्या धोरणावर सातत्याने टीका करत आहेत. केंद्र सरकारला फटकारत लस धोरण सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयानेही सांगितले होते. दरम्यान, काल (७ जून) १८ वर्षांपुढील सर्वांचे केंद्र सरकार मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा मोदी सरकारने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेनंतर काही प्रश्न उपस्थित करत चिदंबरम यांनी सरकारवर टीकास्त्र डागले होते. सरकारवर टीका करताना झालेल्या चुकीबद्दल आता चिदंबरम यांनीच खुलासा केला आहे.

सोमवारी (७ जून) लसीकरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. त्यानुसार केंद्र सरकार १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेणार आहे. केंद्र सरकार २१ जूनपासून लस उत्पादक कंपन्यांकडून लसीची खरेदी करून राज्यांना पुरवेल. त्यामुळे राज्यांना लसीसाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. काही राज्यांनी लस खरेदीसाठी परवानगी मागितली होती. त्यामुळे राज्यांना परवानगी देण्यात आली होती, असेही पंतप्रधान म्हणाले होते.

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेनंतर मोदी सरकारवर टीका केली होती. पण, टीका करताना चिदंबरम यांनी मोदी सरकारने खोटा आरोप केल्याचा म्हटले होते. आता राज्य सरकारांना पंतप्रधान मोदी दोष देत आहेत. केंद्र सरकारने लस खरेदी करु नये, असे कुणीही म्हटलेले नसल्याचे म्हणत चिदंबरम यांनी मोदींना लक्ष्य केले होते.

चिदंबरम यांनी आता या टीकेनंतर एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी काल सरकारवर टीका करता झालेली चूक मान्य केली आहे. थेट लस खरेदी करण्याची राज्य सरकारला परवानगी द्या, अशी मागणी कोणत्या राज्य सरकारने केली होती. याची माहिती एएनआयकडे विचारली होती. सोशल मीडियावरील एका कार्यकर्त्यांने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे अशा पद्धतीची विनंती केल्याचे पत्र पोस्ट केले. मी चुकलो. मी माझी भूमिका दुरुस्त केली असल्याचा खुलासा चिदंबरम यांनी ट्विट करून केला आहे.

केंद्र सरकार १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेत असल्याची घोषणा केल्यानंतर मोदींवर चिदंबरम यांनी निशाणा साधला होता. आपल्या चुकांमधून केंद्र सरकार शिकले आहे, हाच या घोषणेमागचा गर्भित अर्थ आहे. त्यांनी दोन चुका केल्या आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न केला. पण नेहमीप्रमाणे दिशाभूल करण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतःच्या चुकांसाठी विरोधकांना दोषी ठरवले.

केंद्राने कुणीही लस खरेदी करू नये, असे म्हणाले नव्हते. आता राज्यांवर आरोप करत म्हणताहेत की, राज्यांना थेट लस खरेदी करायची होती. त्यामुळे केंद्राने परवानगी दिली. चला जाणून घेऊन या की, लस खरेदी करण्याची परवानगी द्या, असे म्हणत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी, कोणत्या राज्य सरकारने, कोणत्या तारखेला मागणी केली होती, असे चिदंबरम म्हणाले होते.