केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार एवढ्या किंमतीत मिळणार कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन


नवी दिल्ली – भारतामधील कोरोना प्रतिबंधक लसीकरणासंदर्भातील मोठी घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली आहे. १८ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर करतानाच राज्यांना सर्व लसी मोफत देण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. तर एकूण लसींपैकी २५ टक्के लसी या खासगी क्षेत्राला देण्यात येणार आहे. त्याचबरोबर लसीच्या किंमतीपेक्षा जास्तीत जास्त १५० रुपये आकारण्याचे आदेश मोदींनी दिले आहेत. म्हणजेच खासगी रुग्णालयांमध्ये लसीच्या किंमतीपेक्षा केवळ १५० रुपये अधिक घेऊन लस दिली जाणार आहे. सर्वसामान्यांना या नव्या नियमांचा फायदा होणार असला तरी हे नवीन नियम २१ जूनपासून लागू झाल्यानंतर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा एक डोस किती रुपयांना मिळणार याबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे.

देशातील प्रत्येक राज्यातील १८ वर्षांवरील सगळ्या नागरिकांसाठी २१ जून म्हणजेच आंतरराष्ट्रीय योग दिनापासून भारत सरकार मोफत कोरोना प्रतिबंधक लस देणार असल्याचेही मोदींनी सांगितले आहे. स्वत: केंद्र सरकार लसी विकत घेऊन ७५ टक्के लसी राज्यांना मोफत वाटणार असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. उरलेल्या २५ टक्के लसी खासगी रुग्णालयांना देण्यात येणार असून या लसी ज्यांना विकत घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी खासगी रुग्णालयात पेड व्हॅक्सिनेशनची सुविधा देण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. पण तिथे सुद्धा रुग्णालयांनी लसींसाठी वाटेल तसे पैसे घेऊ नयेत म्हणून लसीच्या किंमतीपेक्षा जास्तीत जास्त १५० रुपये अधिक सेवा शुल्क म्हणून लस देण्याचा नियम बनवण्यात आला आहे.

१५० रुपये लसीच्या किंमतीपेक्षा जास्त आकारुन खासगी रुग्णालयांमध्ये लस दिली जाणार आहे. राज्य सरकारांवर या नियमांचे पालन करण्यासंदर्भातील जबाबदारी सोपवण्यात आल्याची घोषणा मोदींनी केली आहे. म्हणजेच लस देण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या सेवा करावर मोदी सरकारने निर्बंध लावल्यामुळे आता कोरोना प्रतिबंधक लसी स्वस्तात उपलब्ध होणार आहेत.

सीरमने जारी केलेल्या माहितीनुसार कोव्हिशील्ड ही लस खासगी रुग्णालयांना ६०० रुपयांना देण्यात येत आहे. केंद्र सरकारला कंपनी १५० तर राज्यांना ३०० रुपयांना लसीचा एक डोस देणार होती. त्यामुळे नव्या नियमानुसार कोव्हिशिल्डचा एक डोस खासगी रुग्णालयांमध्ये ६०० रुपये डोसची किंमत आणि जास्तीत जास्त १५० रुपये सेवा शुल्क मिळून ७५० रुपयांना उपलब्ध होईल.

हैदराबादमधील भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनच्या एका डोसची खासगी रुग्णालयामधील किंमत १२०० रुपये एवढी आहे. म्हणजेच खासगी रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सिनचा एक डोस घेण्यासाठी १२०० अधिक १५० रुपये सेवा शुल्क असं मिळून १३५० रुपयांना एक डोस उपलब्ध होईल. पूर्वी या डोससाठी १२०० ते दोन हजार रुपयांपर्यत पैसे आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्यामुळेच पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेमुळे खासगी रुग्णालयांमध्ये लस घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.