मेस्सीला मागे टाकत सुनील छेत्रीची गोल संख्येत दुसऱ्या स्थानावर झेप

भारतीय फुटबॉल टीमचा कप्तान सुनील छेत्रीने २०२२ फुटबॉल वर्ल्ड कप आणि २०२३ आशियान कप क्वालिफायर्सच्या ग्रुप ईच्या दुसऱ्या राउंड मध्ये बांग्ला देशाचा २ -० असा पराभव करताना दोन गोल नोंदवले. या कामगिरीमुळे सुनील ने अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लियोनेल मेस्सी याला मागे टाकून जागतिक सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दोन नंबरवर झेप घेतली आहे.

३६ वर्षीय सुनील ने आंतरराष्ट्रीय स्तरावर ७४ गोल केले आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉल मध्ये सध्या खेळत असलेल्या खेळाडू मध्ये क्रिस्तियानो रोनाल्डो १०३ गोल नोंदवून प्रथम स्थानावर आहे. त्यानंतर आता सुनीलचा नंबर आला आहे. सुनीलच्या मागे युएईचा अली ७३ गोल तर मेस्सीने चिली विरुद्ध नोंदविलेल्या गोल मुळे मेस्सी ७२ गोल करून चार नंबरवर आहे. १५ जून रोजी भारताचा सामना अफगाणिस्तान बरोबर होणार आहे.

आंतरराष्ट्रीय फुटबॉल गोल इतिहासात सुनील आता ११ व्या स्थानावर पोहोचला आहे. १० व्या नंबरवर तीन खेळाडू आहेत. त्यात हंगेरीचा सेंडर कोकीक्स, जपानचा कुनिशिगे कामटो, आणि कुवेतचा बशर अब्दुल्ला असून त्यांचे प्रत्येकी ७५ गोल आहेत.