जेफ बेजोस २० जुलैला करणार अंतराळ प्रवास

अमेझॉनचे सीईओ आणि ब्ल्यू ओरिजिन स्पेस कंपनीचे प्रमुख जेफ बेजोस परिस्थिती अनुकूल असेल तर २० जुलै रोजी ब्ल्यू ओरिजिन स्पेस फ्लाईट मधून पहिला अंतराळ प्रवास करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ मार्क बेजोस असतील. सोशल मीडियावर ही माहिती बेजोस यांनी शेअर केली आहे.

ब्ल्यू ओरिजिन स्पेस कंपनी सर्वसामान्य प्रवाशांना अंतराळ सैर करण्यासाठी सिध्द होत असल्याची घोषणा बेजोस यांनी पूर्वीच केली आहे. त्यांच्या कंपनीच्या स्पेस क्राफ्टचे नामकरण न्यू शेफर्ड स्पेस टूरीस्ट रॉकेट असे असून या रॉकेटच्या १४ वेळा यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. हे स्पेस रॉकेट एन १४ नावानेही ओळखले जाते. बेजोस यांचे २० जुलैचे उड्डाण यशस्वी झाले तर अंतराळ पर्यटनाचे मोठे क्षेत्र खुले होणार आहे.

बेजोस ५ जुलै रोजी अमेझॉन सीईओ पदाची जबाबदारी सोडत आहेत. ते म्हणतात, पाच वर्षाचा असल्यापासून त्यांनी अंतराळ प्रवासाचे स्वप्न पाहिले आहे. २० जुलै रोजी भाऊ मार्क याच्यासोबत हे स्वप्न पूर्ण होणार आहे.

टेस्ला सीईओ आणि स्टार कंपनीचे मालक एलोन मस्क यांच्या प्रमाणेच बेजोस यांनाही मंगळावर मानवी वसाहत करण्याची इच्छा आहे. त्यांच्या कंपनीचे ते लक्ष्य आहे. अमेझॉनच्या जबाबदारीतून मोकळे झाल्यावर बेजोस त्यांचा बराच वेळ ब्ल्यू ओरिजिन साठी देणार आहेत. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी बेजोस २०१६ पासून दरवर्षी १ अब्ज डॉलर्स गुंतवत असल्याचे सांगितले जाते.