करीना साकारणार सीता? मानधन ऐकून चक्रावले निर्माते

रामायणातील महत्वाचे पात्र सीता आता नव्याने चित्रपट स्वरुपात साकारले जात असून ही भूमिका बॉलीवूडची स्टार कलाकार करीना उर्फ बेबो करणार असल्याची चर्चा सुरु आहे. चित्रपट निर्माते अलौकिक देसाई यांनी काही महिन्यापूर्वी या चित्रपटासाठी करीना बरोबर संपर्क साधला होता मात्र करीनाने सांगितलेला मानधनाचा आकडा ऐकून निर्माते चक्रावले असल्याचे वृत्त बॉलीवूड हंगामाने दिले आहे.

करीना एका चित्रपटासाठी साधारण ६ ते ८ कोटी मानधन घेते. सीता साठी मात्र तिने १२ कोटींची मागणी केली आहे. करीना विरे द वेडिंग दोन आणि हंसल मेहता यांचा एक चित्रपट अगोदर पूर्ण करणार आहे. हे शुटींग १ महिन्यात संपणार आहे. सीता साठी मात्र करीनाला सलग ८ ते १० महिने द्यावे लागणार आहेत. सीता तिच्या करियर साठी महत्वाचा ठरेल याची पूर्ण जाणीव करीनाला आहे.

निर्माते या चित्रपटातून सीतेच्या दृष्टीकोनातून रामायण मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत. करीना ऐवजी एखादी गुणी तरुण अभिनेत्री घेता येईल का याचा विचार केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी निर्मात्यांची पहिली पसंती करीना हीच आहे. करीना गेली दोन दशके बॉलीवूडवर राज्य करते आहे. तिचा आगामी लालसिंग चढ्ढा लवकरच रिलीज होणार आहे.