ऑसी क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल फायनली होतोय भारताचा जावई

गतवर्षी भारतवंशीय विनी रमण या गर्लफ्रेंड बरोबर भारतीय परंपरेने साखरपुडा केलेला ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल लवकरच विनी बरोबर सात फेरे घेणार असून खऱ्या अर्थाने भारताचा जावई बनणार आहे. भारताचा जावई बनणारा ग्लेन दुसरा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे. यापूर्वी शॉन टेट याने २०१४ मध्ये भारतवंशी मासूम सिंघा हिच्यासोबत लग्न केले आहे. टेट ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज आहे.

ग्लेन आणि विनी यांची ओळख आयपीएल दरम्यान झाली होती. २०१९ मध्ये ग्लेनला मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे क्रिकेट मधून ब्रेक घेण्याची वेळ आली होती. ग्लेनला मानसिक आणि शारीरिक प्रचंड थकवा आला होता. मात्र त्यावेळी विनीने त्याला या स्थितीतून बाहेर पडण्यास मदत केली होती. व्यवसायाने फार्मासिस्ट असलेल्या विनीने ग्लेनला वेळेवर डॉक्टरची भेट घेऊन उपचार करून घेण्यास भाग पाडले होते. ग्लेन म्हणतो, विनी मुळेच मी परत क्रिकेटकडे वळू शकलो. तिने मला या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत केली. २०१७ पासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.