मोदींची मोठी घोषणा; 21 जूनपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे केंद्र सरकार मोफत लसीकरण करणार


नवी दिल्ली – विरोधकांकडून केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर सातत्याने टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्त्वाची घोषणा केली. देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने केवळ कोरोना योद्धे आणि 45 वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. तर राज्यांनी 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. मात्र, आता 21 जागतिक योग दिनापासून म्हणजेच 21 जूनपासून 18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे.

दरम्यान देशातून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. पण पुन्हा तिसरी लाट येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे लशीच्या तुटवड्यावरून बहुतांश राज्यांमध्ये ओरड होत आहे. अनेक राज्यांनी जागतिक पातळीवर निविदा काढल्या आहेत. मात्र, या निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याने आता विरोधकांकडून मोदी सरकारला लक्ष्य केले जात आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला लसीकरणाच्या धोरणावरून झापले होते. लसीकरणासंदर्भात उपस्थित झालेल्या लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील लस उत्पादन आणि लसीकरणाच्या वेगावरही सरकारची भूमिका मांडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना लसीकरणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका मांडली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतची भारताची लढाई सुरूच आहे. जगातील इतर देशांप्रमाणे भारतही दुसऱ्या लाटेत मोठ्या संकटातून जात आहे. अनेकांनी आपल्या प्रिय माणसांना गमावले आहे. शंभर वर्षानंतर ही महामारी आली आहे. एवढ्या मोठ्या संकटाशी भारत अनेक आघाड्यांवर लढला आहे. रुग्णालये, उपचार सुविधा उभारण्यापासून ते ऑक्सिजन पुरवठ्यापर्यंत भारताने काम केले. आरोग्य सुविधा उभारल्या.

एप्रिल आणि मे मध्ये भारतात ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली होती. ही मागणी पुर्ण करण्यासाठी पुर्ण प्रयत्न केले गेले. खूप कमी वेळात ऑक्सिजनचं उत्पादन १० टक्क्यांनी वाढवण्यात आले. जगभरातून ऑक्सिजन मागवला. याच पद्धतीने जीवनरक्षण औषधांचे उत्पादनही वाढवण्यात आले. रुप बदलणाऱ्या या शत्रूविरोधात मास्क, सहा फूटांचे अंतर हेच सूत्र आहे, असे आवाहन मोदींनी केले.

तसेच भारताने स्वदेशी बनावटीच्या लसींमुळे लसीकरण मोहिमेत वेग घेतला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. जनतेला संबोधून बोलत असताना पंतप्रधानांनी देशाच्या लसीकरणासंदर्भातील कामगिरीचे कौतुक केले आहे. त्याचवेळी मोदींनी पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यातला फरकही दाखवून दिला आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले, सध्या देशात आपण भारतीय बनावटीच्या दोन लसी तयार केल्या. जर त्या केल्या नसत्या तर काय झालं असते याचा विचार करा. आत्ता जर आधीसारखी परिस्थिती असती तर संपूर्ण देशाचं लसीकरण करण्यासाठी 40 वर्षे लागली असती.

देशातील लसीकरण मोहिमेवर बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारतात जर लसींची निर्मिती झाली नसती तर विचार करा काय झाले असते, एवढ्या मोठ्या संख्येला आपण लस कशी देऊ शकलो असतो? पोलिओ, कांजण्या अशा साथींच्या लसी विदेशातून भारतात यायला दशके लागली होती. पण भारताने एकाच वर्षात दोन लसींची निर्मिती केली आहे.

देशातील वैज्ञानिकांचे आणि शास्त्रज्ञांचे कौतुकही त्यांनी केले. आपल्या देशातील शास्त्रज्ञ, लस निर्मिती कंपन्या बड्या देशांच्या तोडीस तोड काम करत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत 23 कोटी देशवासियांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

सरकारने लस निर्मितीसाठी अर्थसहाय्य केले आहे. त्याबद्दल बोलताना मोदी म्हणाले, भारतात लस उत्पादक कंपन्यांना सरकारने संशोधनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यापासून सगळी मदत केली आहे. या कंपन्यांना हजारो कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

लसींच्या आगामी काळातील पुरवठ्याबद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केले आहे. देशात सध्या सात कंपन्या करोना प्रतिबंधक लसीचं उत्पादन करत आहेत. तीन लसींच्या चाचण्या सुरु आहेत. दुसऱ्या देशांशी पण लसींच्या पुरवठ्याबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे.

जगात लसीची मागणी होत आहे. जर आज भारतात लशींचे उत्पादन झाले नसते, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती. मागचा इतिहास बघितला, तर लक्षात येते की, भारताला दशके लागायची. पोलिओसह अनेक लशींसाठी देशवासियांना वाट बघावी लागली. पण, 2014 मध्ये भारतात लसीकरणाचा वेग 60 टक्केच होता. उत्पादनाचे प्रमाण खूप कमी होते. हे आमच्यासाठी खूप चिंतेची गोष्ट होती. जर त्याच वेगाने लसीकरण झाले असते, तर देशाला ४० वर्ष लागले असते.

पण, यासाठी सरकारने मिशन इंद्रधनुष्य सुरू केले. लस तयार केली जाईल आणि ज्याला गरज आहे, त्याला दिली जाईल. केवळ सहा वर्षात लसीकरणाचा वेग ६० टक्क्यांवरून ९० टक्के झाले. सरकारने लसीकरणाचा वेग वाढवलाच, पण त्याचा विस्तारही केला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

लसीकरणाच्या दिशेन संपूर्ण देश निघाला होता, पण कोरोना महामारीने आपल्याला ग्रासले. भारतच नाही, तर जगासमोर शंका उपस्थित झाली की, भारत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला कसे वाचवणार. पण, निश्चय असेल तर मार्ग निघतोच. भारताने एका वर्षात दोन स्वदेशी लशी तयार केल्या. भारत लसीकरणात मागे नसल्याचेही मोदी म्हणाले.