महाराष्ट्रात करोना बळीचा आकडा १ लाख पार, देशातील एकमेव राज्य

महाराष्ट्रात करोना बळींच्या संखेने एक लाखाचा आकडा पार केला असून ही संख्या १,००,१३० वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात राज्यात २३३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एक लाखापेक्षा अधिक करोना मृत्यू झालेले महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य असल्याचे समजते.

देशात करोनाची दुसरी लाट घातक ठरली आहे. आता ही दुसरी लाट हळू हळू ओसरते आहे तरीही तिचा धोका संपलेला नाही. देशात आजही एक लाखापेक्षा अधिक संखेने संक्रमित सापडत असून दररोज सरासरी तीन हजार मृत्यू होत आहेत. महाराष्ट्रावर या दुसऱ्या लाटेचा प्रभाव सर्वाधिक आहे.

महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासात १२५५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. १४४३३ रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात एकूण संक्रमित संख्या ५५,४३,२६७ असून रिकव्हरी रेट ९५.०५ वर गेला आहे तर मृत्युदर १.७२ वर आला आहे. सध्या राज्यात १,८५,५२७ सक्रीय रुग्ण आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाचा धोका अजून कायम असल्याने निर्बंध लागू असल्याचे सांगितले आहे. मात्र जेथे परिस्थिती सुधारते आहे, तेथील निर्बंध कमी करण्याचे अधिकार संबंधित प्रशासनाला दिल्याचे स्पष्ट केले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत कर्नाटकात ३१२६०, दिल्ली मध्ये २४५५७, उत्तर प्रदेशात २११५१ तर प.बंगाल मध्ये १६१५२ मृत्यू झाले आहेत.