प्रिन्स हॅरी आणि मेगनला कन्यारत्न

ब्रिटनचा ड्युक प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मर्केल याना अमेरिकेत कन्यारत्न झाले असून या मुलीचे नाव लिलीबेट लिली डायना असे ठेवले गेले आहे. प्रिन्सच्या प्रवक्त्याने रविवारी दिलेल्या माहितीनुसार महाराणी एलिझाबेथ आणि प्रिन्सेस डायना यांच्या संयुक्त नावावरून हे नाव निवडले गेले आहे. बाळाचे वजन ७ पौंड असून आई आणि बाळ स्वस्थ्य आहेत.

लिलीबेट हे महाराणी एलिझाबेथ यांचे लाडाने बोलाविण्याचे नाव होते. दुसरे नाव आजी डायनाचे असून तिचा सन्मान म्हणून हे नाव आहे. ब्रिटन शाही परिवारात नवजात बालकाचे स्थान आठवा वारस असे आहे.

शुक्रवारी प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. त्यानुसार ४ जून रोजी सेन्टा बार्बरा कॉटेज मध्ये सकाळी ११.४० मिनिटांनी मुलीचा जन्म झाला. शाही परिवाराने या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. राणी एलिझाबेथचे हे ११ वे पतवंड आहे.