गुजराथ केवडिया शहर बनणार पूर्णपणे ई वाहन वाहतूक शहर

जगातील सर्वाधिक उंचीच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यामुळे जगभरात चर्चेत आलेले गुजराथचे केवडिया शहर पूर्णपणे ई वाहन शहर बनविले जात असून देशातील अशी व्यवस्था असलेले ते पहिलेच शहर असेल. वाढते प्रदूषण आणि हवामान बदल प्रतिबंधासाठी देशभरात विविध योजना आखल्या जात आहेत. त्यात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण दिनी,  आदिवासी बहुल नर्मदा जिल्ह्यात देशातील पहिले ई वाहन शहर संबंधी घोषणा केली होती.

त्यापाठोपाठ रविवारी केवडिया विकास पर्यटन संचालक प्राधिकरणाने हा भाग ई वाहन क्षेत्र म्हणून विकसित केला जात असल्याची घोषणा केली आहे. पर्यटकांना येथे डिझेल ऐवजी बॅटरी ऑपरेटेड बस असतील. स्थानिकांना तीन चाकी ई वाहन खरेदीसाठी मदत केली जाणार आहे आणि प्राधिकरणाला सुद्धा ई वाहन खरेदीसाठी सबसिडी दिली जाणार आहे. ई रिक्षा चालविणाऱ्या कंपनीला किमान ५० रिक्षाचालक यादी द्यावी लागेल आणि त्यात महिला तसेच पूर्वीपासून ई रिक्षा चालवीत असलेल्यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.

या शहरात सध्या प्रदूषण पसरविणारा कोणताही उद्योग नाही. दोन जलविद्युत प्रकल्प येथे आहेत असे समजते.