करोना काळात सुद्धा भारतात स्टार्टअपचा वेगाने विकास

करोना काळात अनेक उद्योग डबघाईला आले असताना भारतात स्टार्टअप विकास खुपच वेगाने झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या १८० दिवसात म्हणजे सहा महिन्यात १० हजार नवीन स्टार्टअप नोंदले गेले असून त्यात अन्न प्रक्रिया, उत्पादन विकास, अॅप्लीकेशन डेव्हलपमेंट, आयटी कन्सल्टन्सी यांची संख्या अधिक आहे. विशेष म्हणजे यातील ४५ टक्के स्टार्टअपचे नेतृत्व महिला करत आहेत.

२०१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी स्टार्ट अप इंडिया योजना जाहीर केली आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड यासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते. २०१६-१७ मध्ये ७४३ स्टार्टअप ना मान्यता दिली गेली होती. गतवर्षी २०२०-२१ मध्ये १६ हजाराहून अधिक स्टार्टअपना मान्यता मिळाली. ३ जून २०२१ पर्यंत मान्यता मिळालेल्या स्टार्टअपचा आकडा ५० हजारावर गेला आहे.

करोना मुळे ऑनलाईन व्यवसायला चालना मिळाली त्याचा फायदा स्टार्टअप ना मिळाला आहे. करोना मुळे थांबलेले फंडींग सप्टेबर २०२० पासून पुन्हा सुरु झाले आहे त्यामुळे स्टार्ट अपचा विकास वेगाने होत असून मान्यताप्राप्त स्टार्टअप देशातील ६२३ जिल्यात सुरु आहेत. रोजगार वाढीत या स्टार्टअपनी महत्वपूर्ण योगदान दिले असून २०२०-२१ मध्ये १ लाख ७० हजार लोकांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.