अमरनाथ मार्गावर बनतोय पक्का रस्ता

बाबा बर्फानी म्हणजे अमरनाथ यात्रेवर यंदाही करोनाचे सावट असल्याने सध्या तरी यात्रा स्थगित केली आहे. मात्र या वेळचा सदुपयोग अमरनाथ श्राईन बोर्ड प्रशासनाने करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. बालताल आणि पहिलगाम या दोन्ही मार्गावर पक्की सडक बनविण्याचे काम या महिन्यात सुरु केले जात असल्याचे समजते. या दोन्ही मार्गावर १२ फुटी रुंदीचा रस्ता बनविला जात असून येथून पायी जाणारे, घोड्यावर जाणारे तसेच डोलीवाले जाऊ शकतील.

या भागाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर दोन्ही मार्गावरचा प्रवास धोक्याचा आहे. येथे काही ठिकाणी अगदी अरुंद मार्ग आहे आणि बरेचदा हा मार्ग निसरडा असतो. रस्ता पक्का झाला की हवा खराब झाली तरी यात्रा थांबणार नाही. मार्गाच्या दोन्ही बाजूला रेलिंग बसविले जाणार आहे त्यामुळे प्रवास कमी धोक्याचा होईल. शिवाय दरवर्षी रस्ता दुरुस्ती साठी होणारा खर्च आणि वेळ वाचणार आहे.

या मार्गावर दोन्ही बाजूला पिण्याचे पाणी आणि शौचालय सुविधा दिली जाणार आहे. सध्या ही सुविधा आहे पण कमी प्रमाणात आहे. पक्का रस्ता बनल्यामुळे यात्रेकरूना यात्रा सुलभ होईल असे बोर्डाचे म्हणणे आहे. यंदा यात्रा स्थगित होण्याची शक्यता आहे त्यामुळे गर्दी कमी असेल त्यामुळे रस्ता बनविण्याचे काम वेगाने होऊ शकेल असे समजते.