दहावीपर्यंत शिकलेल्या ‘या’ पठ्ठ्याने साध्य केली बहुराष्ट्रीय कंपनीचा मालक होण्याची किमया


आपल्या आयुष्यातील दोन महत्वाचे टप्पे म्हणजे दहावी आणि बारावी. त्यातच नुकतेच बारावीचे निकाल जाहिर झाले आहेत. त्यात कुणाल यश मिळाले तर कोणाच्या वाट्याला अपयश आले. परीक्षेत मिळालेल्या अपयशामुळे काहीजण खचून जात आपले आयुष्य संपवून घेतात. पण एक असा पठ्ठा आहे ज्याने पदरी आलेल्या अपयशामुळे खचून न जाता त्यावर मात करत जगमान्य अँटीव्हायरस कंपनीचा कारभार उभारला. त्यांचे नाव कैलास काटकर असे असून फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कैलास यांच्या कंपनीची आज जगभरात २६ कार्यालये आहेत. संगणक, मोबाईल, लॅपटॉप सुरक्षित ठेवणाऱ्या नामांकित ‘क्वीकहील’ या बहुराष्ट्रीय कंपनीचे काटकर हे मालक आहेत. त्यांनी जिद्दीने मिळविलेल्या यशाचा प्रवास थक्क करणारा आहे.

कैलास काटकर यांनी काळाची पावले ओळखत पुस्तकी शिक्षणापेक्षा व्यावसायिक ज्ञान अवगत करून घेतले. त्यांनी याच जोरावर बहुराष्ट्रीय कंपनीचा मालक होण्याची किमया दाखवून दिली आहे. सातारा जिल्हयातील ललगुंद गाव पोट भरण्यासाठी काटकर यांच्या आई-वडिलांनी सोडले. पुण्यात ते खासगी नोकरी करू लागले. मग आई-वडिलांच्या संसाराला आधार म्हणून त्यांची कैलास आणि संजय ही दोन्ही मुले मिळेल ते काम करू लागले. पुढे फक्त दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या कैलासने कॅलक्युलेटर दुरुस्त करता करता सायबर सुरक्षा उद्योगाच्या दिशेने झेप घेतली. बंधू संजय यांनीही त्यांना मोलाची साथ दिली.

क्वीकहीलचा अँटीव्हायरस जगातील १०० हून अधिक देशात विकला जातात. सायबर सुरक्षेच्या जागतिक बाजारपेठेत कैलास काटकर यांनी भारताचे नाव उंचावले आहे. जगभरात रोज साडेचार ते साडेपाच लाख व्हायरस तयार होतात. तेव्हा डिजीटल सुरक्षेसाठी मोबाईल, सर्व्हर सिक्युरिटीसह इतर अनेक सुरक्षा उत्पादने सुरू केली आहेत. सुमारे साडेचारशे कोटींची त्यांच्या कंपनीची उलाढाल आहे.

त्यांनी आपल्या शिक्षणाबाबत सांगताना सांगितले की दहावीनंतर जॉब करायला लागलो. ज्याची आवश्यकता आहे, ते शिकलो आणि पुढे जात गेल्यामुळे दहावीनंतरचे पुढील शिक्षण झाले नाही. कॅलक्युलेटरची ते पुण्यात दुरुस्ती करत होते. १९८६ ला त्यांनी बँकेत पहिल्यांदा कॉम्प्युटर पाहिला. काळानुसार कॅलक्युलेटर मागे पडणार अन् कॉम्प्युटरमध्येच भविष्य असल्याचे त्यांनी ओळखले होते. त्यांना कॉम्पयुटर शिकण्याची गरज वाटू लागली होती. पण तेव्हा पुण्यात कॉम्प्युटरचे क्लासेस नव्हते. त्यांनी त्यासाठी मुंबईला जावून कॉम्प्युटरची पुस्तके आणली. ते पुस्तके वाचून संगणक दुरुस्त करायला शिकले. त्यांना तरीही अडचणी येत राहिल्या. याबाबत सांगताना ते म्हणाले, दुरुस्ती मी नवीनच शिकलेला असल्याने व लहान असल्यामुळे कॉम्प्युटर दुरुस्तीसाठी कोणीही देत नव्हते. पण एका माध्यमाचे काम मिळाल्यानंतर न्यूज इंडिया इन्शुरन्ससारख्या कंपन्यांची कामे मिळत गेली.

कॉम्प्युटरला १९९३ नंतर व्हायरसच्या समस्या येवू लागल्या. सॉफ्टवेअरची समस्या सोडविण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स शिकणाऱ्या भावाला मदत करायला त्यांनी सांगितले. काही टूल्स त्याने तयार केले. त्यातूनच टूल्स देणारे उत्पादन तयार करायला १९९३ मध्ये सुरुवात केली. पुढे १९९५ साली क्वीकहिलची सुरूवात झाली. १९९६ साली नेटवर्किंग वाढल्यानंतर विविध उत्पादने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. काटकर बंधूंनी अपयशाने खचून न जाता ज्ञानाची कास धरली तर जगात काहीच अशक्य नसल्याचे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. अनेकांना त्यांचे यश हे नकारात्मकतेच्या ‘व्हायरस’वर मात करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.

Leave a Comment