फळबागायतीचे काही फायदे


फळबागायतीचे महत्वाचे फायदे म्हणजे अन्य पिकांपेक्षा त्याचे उत्पन्न जास्त असते. कर्नाटकामध्ये असलेल्या फळबागायतीविषयी एक नवीन माहिती समोर आली आहे. ती आपल्याला विचार करायला लावणारी आहे. कर्नाटकातील १४ टक्के क्षेत्र फळबागायतीखाली आहे. मात्र त्यातून मिळणारे उत्पन्न एकूण शेती उत्पादनाच्या ४० टक्के एवढे आहे. म्हणजे कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देण्याची फळांची क्षमता असते. आपल्या शेतात आपण पडिक क्षेत्रात सुद्धा फळांची लागवड करू शकतो. त्या दृष्टीने त्या जमिनीची करावी लागणारी तयारी आणि मशागत कमीच असते. म्हणजे कमी गुंतवणुकीमध्ये अधिक फळबागायती करता येते आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न जास्त असते. असे फळबागायतीचे दुहेरी फायदे आहेत. आपण आपल्या शेतामध्ये स्वत:च याचा अनुभव घेऊ शकतो. आपल्या शेतातल्या जेवढ्या भागात फळबाग लावणार आहोत तेवढ्या भागाचा वेगळा हिशोब ठेवावा आणि शेताच्या अन्य भागातल्या पिकांचा वेगळा हिशोब ठेवावा. आपण स्वत:च या दोन्हीमधला फरक स्वत:च्या अनुभवाने पडताळून पाहू शकतो.

दुसरी गोष्ट म्हणजे फळबागायतीला भांडवल तर कमी लागतेच परंतु मजुरीही कमी लागते. सध्या अनेक शेतकरी शेतमजुरांची मजुरी वाढल्यामुळे त्रस्त झालेले आहेत. त्यांना फळबागायतीमध्ये हा दिलासा मिळू शकतो.फळांना मिळणारी किंमत ही फारच असते. म्हणजे फळबाग लावणारा शेतकरी हुशार, धाडशी आणि माहीतगार असेल आणि स्वत:च स्वत:च्या मालाची विक्री करण्याएवढा कल्पक असेल तर त्याला फळांचे फारच पैसे मिळू शकतात. तसे धाडस करून अनेक शेतकर्‍यांनी फळांच्या विक्रीची व्यवस्था स्वत:च केलेली आहे. सध्या महाराष्ट्रात आणि विशेषत: आंध्रामध्ये शेतकर्‍यांना स्वत:चा माल थेट ग्राहकांना विकता यावा यासाठी बर्‍याच सोयी केल्या जायला लागल्या आहेत. त्यांचा फायदा घेऊन शेतकर्‍यांनी स्वत: माल विकला तर चार पैसे जास्त मिळू शकतात. विशेषत: मालाची छाटणी करणे, प्रतवारी करणे आणि उत्तम पॅकिंग करून विकणे या गोष्टी आवश्यक असतात. त्या तशा काही फार अवघड नाहीत.

शेतकर्‍यांकडून स्वत:च फळे विकत घेणारे लोक केवळ उत्तम पॅकिंग करून किंवा दुकानात तो माल चांगला मांडून गिर्‍हाईकाकडून किती तरी चांगली किंमत वसूल करत असतात. तेव्हा त्यांना मिळणारे भाव पाहिले तर शेतकरी स्वत:च आपला माल विकण्यास उद्युक्त होऊ शकतात, इतका चांगला भाव त्यांना मिळत असतो. शेतकर्‍याची पूर्ण आमराई काही हजार रुपयात विकत घेतली जाते. ते रुपये देताना सुद्धा बरीच खळखळ केली जाते. परंतु शेतकर्‍याच्या हातात काही हजारो रुपये टिकवून व्यापारी मात्र तेवढ्या आंब्याचे लाखो रुपये करतात. सध्या बाजारात विक्रीला आलेल्या फळांच्या अवाच्या सवा किंमती पाहिल्या म्हणजे आश्‍चर्य तर वाटतेच, पण तोच माल शेतकर्‍यांकडून घेताना किती पडत्या भावाने घेतलेला असतो हे पाहिले म्हणजे दु:ख सुद्धा वाटते. एकंदरीत फळबागायतीची ताकद शेतकर्‍यांनी लक्षात घेतली पाहिजे हेच सांगायचे आहे.

कोरडवाहू फळबागा
बागायत म्हटल्याबरोबर ती बागायतीच असेल असे नाही. जिरायत क्षेत्रात म्हणजे कोरडवाहू शेतात सुद्धा फळांची बागायत करता येते. उलट फळबागायतीचा कोरडवाहू क्षेत्रामध्ये अतिशय चांगला उपयोग झालेला आहे. विशेषत: महाराष्ट्राच्या ४० टक्के क्षेत्रावर दुष्काळाची तलवार कायम टांगलेली असते. म्हणून या क्षेत्राला दुष्काळप्रवण क्षेत्र असे म्हटले जाते. पावसाची शाश्‍वती नाही आणि हवामान कमालीचे कोरडे, त्यामुळे कोणत्याही क्षणी दुष्काळ पडू शकतो अशी स्थिती या भागात असते. अशा लोकांनी कमीत कमी पाण्यात येणार्‍या किंवा निव्वळ पावसाच्या पाण्यावर येणार्‍या फळांची लागवड केली तर त्यांना चांगले उत्पन्नही मिळते आणि ते निश्‍चित स्वरूपाचे असल्यामुळे आर्थिक दैन्यावस्थेतून सुटका होण्यास त्याची मदत होते. बर्‍याच कोरडवाहू फळांकडे आपले लक्षच नाही. अशा कोरडवाहू फळांची झाडे शेताच्या बांधावर किंवा अधेमधेच कोठे तरी आपोआपच उगवून येतात, वाढतात आणि आपल्याला नकळतपणे चार पैसे देऊन जातात. मग याच फळांची नीट व्यवस्थित लागवड करून त्याला उत्पन्नाचे साधन बनवायला काय हरकत आहे ? उदाहरणार्थ चिंच हे पीक विचारात घ्या.

आपल्याकडे चिंचेची झाडे मुद्दाम कोणी लावत नाहीत. कधी तरी चिंचोके पडून ती झाडे आपोआप उगवलेली असतात आणि त्यांना चिंचा लागत राहतात. चिंचेचे झाड तीन साडेतीनशे वर्षे जगते. चिंचेला फवारणी करावी लागत नाही, त्याला पाणी द्यावे लागत नाही. चिंचेला चोर चोरून नेत नाही आणि वैशिष्ट्य म्हणजे दुष्काळ पडला की, चिंचेच्या झाडाला जास्त चिंचा लागतात. चिंच जर एवढी गुणकारी असेल तर तिची व्यवस्थित आणि नियोजनबद्ध लागवड करायला काय हरकत आहे? फार देखरेख न करता चिंचेची बागायत करता येते. २००४ साली सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यात तीव्र पाणी टंचाईमुळे दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. तेव्हा लोकांना कामे मिळत नव्हती, लोकांच्या शेतामध्ये नित्य कामाला जाणार्‍या शेतमजूर महिला सुद्धा बेकार बसलेल्या होत्या. दोन-तीन गावांमध्ये मात्र असा अनुभव आला की, गावातल्या चिंचांच्या झाडांना बर्‍याच चिंचा लागलेल्या आहेत. काही चिंचांची झाडे खाजगी मालकीची होती. त्यांनी ती झाडे व्यापार्‍यांना विकली. त्या व्यापार्‍यांनी चिंचा काढून त्या गावातच फोडून घ्यायला सुरुवात केली तेव्हा महिलांना चांगलाच रोजगार मिळाला. अगदी घरी बसून सावलीत काम करून, चिंचा फोडून या महिलांनी चांगला पैसा मिळवला. चिंच हे तसे उपेक्षित आणि दुर्लक्षित फळझाड आहे. परंतु ही चिंच सुद्धा आपल्याला चांगला रोजगार मिळवून देऊ शकते, याचा साक्षात्कार त्या गावातल्या शेतकर्‍यांना आणि शेतमजुरांना प्रथमच झाला. अर्थात असा साक्षात्कार होऊन सुद्धा कोण्या शेतकर्‍यांनी चिंचेची लागवड केली नाही. ही गोष्ट दुर्दैवाची आहे. कारण आलेल्या अनुभवातून शिकून काही तरी करण्याच्या बाबतीत आपण फार तत्पर नाही.

चिंचेच्या बाबतीतला हा अनुभव अनेकांना आलेला आहे. चिंचेला मागणी सुद्धा चांगली आहे. अनेक लोकांच्या जेवणात चिंच अपरिहार्य असते. सध्या अनेक मोठ्या शहरातल्या सुपर मार्केट आणि मॉलमध्ये मलेशियातली चिंच विकायला आलेली आहे. ती चिंच आपल्याकडच्या चिंचेपेक्षा थोडीशी मोठी आहे आणि त्यांनी ती कच्ची विकायला सुरुवात केली आहे. चिंचेचे आकडे चांगल्या बॉक्समध्ये पॅक करून २०० ग्रॅमचा बॉक्स ३० रुपयाला विकला जात आहे. आपण दुर्लक्षित केलेले चिंचेचे झाड या मलेशियातल्या शेतकर्‍यांनी मात्र उत्पन्नाचे चांगले साधन बनवले आहे. आपल्याला असे करता येणार नाही का ? करता येते. पण इच्छाशक्ती हवी. आपणही वाळलेली चिंच तिचे गोळे करून आकर्षकपणे पॅक करून विकू शकतो. चिंचेमध्ये अशा प्रकारे विक्री केल्यास चांगले पैसे मिळवून देण्याची ताकद आहे.

Leave a Comment