काही प्राचीन परंपरा आणि त्यांच्याशी निगडीत फायदे


आपल्या समाजामध्ये अनेक शतकांपूर्वी सुरु झालेल्या काही परंपरांचे पालन घराघरामध्ये आजही केले जात आहे. ह्यातील बहुतेक परंपरा धार्मिक मान्यतांशी संबंधित असल्या तरी त्या परंपरांच्या मागे काही वैज्ञानिक कारणे देखील आहेत. यापैकी एक आहे कान टोचण्याची परंपरा. मुले आणि मुली यांचे अगदी लहानपणीच कान टोचण्याची परंपरा आपल्याकडे गेली अनेक शतके रूढ आहे. पूर्वीच्या काळी स्त्रियांप्रमाणे पुरुष देखील कानांमध्ये आभूषणे परिधान करीत असत. ह्या परंपरेमागची वैज्ञानिक धारणा ही, की जिथे कान टोचले जातात तो बिंदू स्मरणशक्ती वाढविणारा आणि शुद्ध वाणीस सहायक आहे. यामुळे कानांमधून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमधून रक्तसंचार नियंत्रित राहतो. म्हणून अगदी तान्ह्या बाळाचे देखील कान टोचण्याची पद्धत आपल्याकडे रूढ आहे.

कपाळावर चंदनाचा किंवा कुंकवाचा टीळा लावण्याची पद्धतही फार पूर्वीपासून चालत आली आहे. ह्यामागील वैज्ञानिक तर्क हा, की दोन्ही भुवयांच्या बरोबर मध्ये आज्ञा चक्र असते. ह्या चक्राच्या ठिकाणी टीळा लावण्याची पद्धत आहे. ह्या चक्रावर टीळा लावल्याने एकाग्रता वाढते, असे म्हटले जाते. तसेच टीळा लावताना बोटाचा दबाव कपाळावर पडल्याने येथील रक्तसंचार सुरळीत राहत असून रक्त कोशिका देखील सक्रीय राहतात. भोजन करताना खाली जमिनीवर बसून भोजन करण्याची पद्धत पचनतंत्र आणि पोटाच्या एकंदर आरोग्याकरिता चांगली मानली गेली आहे. मांडी घालून बसणे, म्हणजेच सुखासानामध्ये बसणे मेंदूला शांत करणारे आहे.

कोणाला भेटल्यानंतर दोन्ही हात जोडून नमस्कार करणे ह्या परंपरेमागील वैज्ञानिक तर्क असा, की नमस्कार करताना दोन्ही हातांच्या सर्व बोटांची टोके एकमेकांच्या संपर्कामध्ये येतात, व त्यांच्यावर हलका दबाव पडतो. हाताच्या बोटांमधील वाहिन्यांचा संबंध शरीराच्या सर्वच प्रमुख अवयवांशी आहे. त्यामुळे हाताच्या बोटांवर दबाव पडल्याने त्याचा परिणाम शरीरातील प्रमुख अवयवांवर होत असतो. तसेच ‘शेक हँड’ करताना समोरील व्यक्तीच्या हातावरील किटाणूंचा संसर्ग आपल्या हातालाही होण्याचा संभव असतो, त्यामुळे कोणालाही भेटताना हात जोडून नमस्कार करणे उत्तम मानले गेले आहे.

भोजन करताना त्याची सुरुवात तिखट पदार्थ खाण्यापासून करावी आणि भोजनाचा शेवट गोड पदार्थांनी करावा, अशी रीती आपल्याकडे आहे. यामागील वैज्ञानिक तर्क असा, की तिखट पदार्थांमध्ये असलेल्या तेल, मसाले इत्यादी पदार्थांनी शरीरातील आम्लाचे प्रमाण वाढते. म्हणूनच अनेकदा मसालेदार पदार्थांवर ताव मारल्यानंतर पोटामध्ये किंवा छातीत जळजळणे, घशाशी येणे, पित्त होणे अश्या समस्या उद्भवितात. पण मसालेदार तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर त्यावर गोड पदार्थ खाल्ल्याने पोटामधील आम्लाची तीव्रता कमी होत असल्याने भोजनाचा शेवट गोड पदार्थांनी करणे इष्ट मानले गेले आहे.

Leave a Comment