अशाही गोष्टीचा ऑनलाईन लिलाव !


अनेक लोकांना आपल्या संग्रही प्राचीन, दुर्मिळ वस्तू जतन करून ठेवण्याची अतिशय आवड आणि हौस असते. अशा प्राचीन आणि दुर्मिळ वस्तू सहसा लिलावाच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध होत असतात. या लिलावामध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तू अतिशय उच्चांकी किंमतीला विकल्या जात असूनही या वस्तू खरेदी करण्याच्या उद्देशाने लिलावामध्ये सहभागी होत असणाऱ्या हौशी संग्रहाकांची संख्याही मोठी असते. बहुतेकवेळी लिलावाद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होत असणाऱ्या वस्तू अतिशय दुर्मिळ असतात. यामध्ये एखाद्या सुप्रसिद्ध चित्रकाराने चितारलेले एखादे पेंटिंग, एखाद्या राजा-रजवाड्याचा पोशाख, अलंकार, प्राचीन काळची चलनी नाणी, किंवा ऐतिहासिक महत्वाच्या मौल्यवान वस्तू इत्यादींचा समावेश असल्याने या वस्तूंसाठी हजारो डॉलर्सची किंमत मोजण्याची संग्रहकांची तयारी असते. मात्र अमेरिकेतील ओंटारिओ मध्ये राहणाऱ्या डेव्ह अलेक्झांडर नामक एका व्यक्तीने ऑनलाईन लिलाव करण्यासाठी आणलेली वस्तू पाहून लोकांचे चांगलेच मनोरंजन होत आहे.

डेव्हने ऑनलाईन लिलावासाठी सहा वर्षे जुना चीझ बर्गर आणला असून, त्यासाठी आजवर इच्छुकांनी ६२.६५ डॉलर्सची बोली लावली आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्ताच्या अनुसार डेव्ह याने सहा वर्षांपूर्वी आपल्या घरी हा चीझ बर्गर आणि काही फ्रेंच फ्राईज मागविले होते. हेच सहा वर्षांपूर्वीचे अन्नपदार्थ आता एका ऑनलाईन शॉपिंग साईटवर खरेदीसाठी उपलब्ध असून, सर्वात जास्त बोली लावणाऱ्याला हे पदार्थ खरेदी करता येणार आहेत. सुरुवातीला तीस डॉलर्स किंमत निश्चित करण्यात आल्यानंतर आता केवळ काहीच दिवसांमध्ये या पदार्थांची किंमत दुप्पट झाली आहे. मॅकडोनाल्डस मधून खरेदी केलेले अन्नपदार्थ कधीही खराब होत नसल्याचे आपण अनेक जणांकडून ऐकले असल्याने हे पदार्थ आपण सहा वर्षांपासून जपून ठेवले असून, आता लीलावाद्वारे विक्री करण्याचे ठरविले असल्याचे डेव्ह म्हणतात.

Leave a Comment