ज्योतिष शास्त्रानुसार नशीब उजळवितात या अंगठ्या


नशिबाची साथ असल्याशिवाय मनोरथ पूर्ण होत नाहीत याचा अनुभव अनेकांना येत असतो. नुसते प्रामाणिक कठोर परिश्रम हवे ते दान पदरात टाकतीलच याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. नशीब सारखे तंत्रवत राहिले तर माणूस यशाच्या आशेने दुसरे मार्ग शोधू लागतो आणि ज्योतिषी, वास्तूशास्त्र याचा आधार घेऊ पाहतो. यात विश्वास अथवा अंधाविश्वास याचा विचार केला जात नाही आणि केवळ भारतीयच नाही तर जगभरात या प्रथा अस्तित्वात आहेत.

रोजच्या आयुष्यात असलेला त्रास कमी व्हावा, सुख समृद्धी यावी, यश मिळावे यासाठी अनेकदा विविध प्रकारच्या पूजा, तोडगे, दाने असे उपाय सुचविले जातात तसेच विविध प्रकारच्या अंगठ्या बोटात घालण्याचा सल्ला दिला जातो. यात सहा प्रकारच्या अंगठ्या विशेष महत्वाच्या मानल्या जातात. या अंगठ्या वापरल्याने त्रास अडचणीतून सुटका होते असा समज आहे.


वास्तू शास्त्रानुसार आणि ज्योतिष शास्त्रानुसार ज्याच्या पत्रिकेत कालसर्प दोष असतो त्यांना अपत्य होण्यास अडचण येते तसेच घरात शांतता राहत नाही. पितृदोष, ग्रहण दोष असलेल्यानाही असाच त्रास होतो. तो दूर करण्यासाठी सर्पमुद्रा असलेली अंगठी वापरण्याचा सल्ला दिला जातो. ही वापरल्याने वरील सर्व दोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते.


तांबे हा धातू औषधीय गुण असलेला आहे. ज्यांना उष्णतेचे विकार आहेत यांना तांब्याची अंगठी हातात घालायला सांगितले जाते. तसेच ही अंगठी सूर्यदोष कमी करणारी मानली जाते तसेच ती वापरणाऱ्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा, पद, सन्मान मिळवून देते असे मानले जाते.


आकाशातील ग्रह माणसाच्या आयुष्यावर परिणाम करतात असा समज आहे. त्यामुळे नवग्रह म्हणजे नउ ग्रहांसाठी जी विशिष्ट रत्ने ठरविली गेली आहेत त्या नवरत्नाची अंगठी बोटात घातली तर चांगले आरोग्य, सुख समृद्धी, मानसिक शांती लाभते असे ज्योतिषी सांगतात. ही अंगठी मनातील नकारात्मक भावना संपविते आणि ज्योतिषाचा सल्ला न घेताही बिनधास्तपणे ती वापरता येते.


कासवमुद्रा असलेली अंगठी नशीब उजळविणारी आहे यावर अनेक लोकांचा विश्वास आहे. जीवनातील अनेक दोषांची शांती करणारी, आत्मविश्वास वाढविणारी आणि धन संपदा वृद्धी करणारी असेही तिचे गुण सांगितले जातात.


घोड्याच्या नालीपासून बनविलेली अंगठी शानिदोष दूर करणारी आहे. ज्योतिषी साडेसातीचा त्रास असलेल्यांना तसेच ज्यांच्या पत्रिकेत शनीची वक्रदृष्टी आहे त्यांना ही अंगठी वापरण्याचा सल्ला देतात. त्यामुळे या पिडा कमी होतात असे मानले जाते.


हत्तीची प्रतिमा असलेली अंगठी आर्थिक संकटातून मुक्ती देते असा समज आहे. ही अंगठी वापरणाऱ्याच्या घरात धनधान्याची रेलचेल होते, त्याला कर्जातून मुक्ती मिळते आणि त्या घरावर कुबेराची कृपा होते असे मानले जाते.

Leave a Comment