अभिनेत्रीसह १५ जणांचे बनावट ओळखपत्राद्वारे लसीकरण; दोषींवर कारवाई करण्याचे आदेश


ठाणे : बनावट ओळखपत्र बनवून देऊन अभिनेत्री मीरा चोप्रा हिच्याप्रमाणेच आणखी २५ जणांपैकी १५ जणांना लस देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी दिले आहेत.

राज्य शासनाच्या आदेशानुसार १८ ते ४४ वयोगटाचे ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये लसीकरण बंद आहे. तरीही महापालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रावर अभिनेत्री मीरा चोप्रा हिने लसीचा पहिला डोस घेतल्याचा प्रकार समोर आला होता. महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझा कोरोना रुग्णालयामध्ये पर्यवेक्षक असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून त्याद्वारे तिचे लसीकरण करण्यात आले होते.

आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी नुकताच या प्रकरणाचा चौकशी अहवाल आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे सादर केला आहे. त्यामध्ये आणखी २५ जणांना बनावट ओळखपत्र बनवून देऊन त्यापैकी १५ जणांना लस देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.