सर्वात स्वस्त ठरु शकते बायोलॉजिकल-ई कंपनीची कोरोना प्रतिबंधक लस


नवी दिल्ली – बायोलॉजिकल-ई तयार करत असलेली आरबीडी प्रोटीन सब युनिट व्हॅक्सिन Corbevax ही भारतातील सर्वात स्वस्त लस ठरू शकते. पण, या लसीला अद्याप आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली नाही. कोर्बेव्हॅक्स ही लस Hepatitis B लसीसारखी बनवली असून तिचा वापर केला पारंपारिक पद्धतीने जाईल, अशी माहिती नॅशनल स्कूल ऑफ ट्रोपिकल मेडिसिनच्या डीन डॉ. मारिया इलेना बोट्टाझी यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

फक्त 110 रुपयांचा खर्च कोर्बेव्हॅक्स लस उत्पादन करण्यासाठी येतो. या लसीच्या दोन्ही डोसेसची किंमत 400 रुपयांपर्यंत देखील असू शकते, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सध्या वापरात असलेली सीरम इंस्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लसीचा एक डोस राज्य सरकारला 300 रुपयांना आणि खाजगी रुग्णालयांना 600 रुपयांना मिळत आहे. तर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा एक डोस राज्य सरकारला 400 रुपयांना आणि खाजगी रुग्णालयांना 1200 रुपयांना मिळत आहे. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचा एक डोस 995 रुपयांना मिळत आहे. वरील लसींच्या किंमतीच्या तुलनेत कोर्बेव्हॅक्स लसीची संभाव्य किंमत कमी आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लस कोर्बेव्हॅक्सच्या निर्मितीसाठी बायोलॉजिकल-ई सोबत करार केला आहे. सरकारकडून यासाठी बायोलॉजिकल-ई कंपनीला 1500 कोटी रुपयांचे आगाऊ पेमेंट करण्यात आले आहे. ऑगस्ट ते डिसेंबर 2021 दरम्यान बायोलॉजिकल-ई कडून या लसीचे 30 कोटी डोसेस तयार करण्यात येणार आहेत.

सध्या देशात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि सीरम इंस्टिट्यूटची कोव्हिशिल्ड या दोन लसी लसीकरण मोहिमेत वापरण्यात येत आहेत. रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली असून लसीच्या उत्पादनासाठी देखील सीरम इंस्टीट्यूटला मंजूरी देण्यात आली आहे. त्यानंतर ही लस देखील लसीकरण मोहिमेत सहभागी होईल. त्यात आता कोर्बेव्हॅक्स लसीची देखील भर पडणार आहे.