ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावरुन संजय राऊतांनी लगावला टोला


मुंबई – महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी भावना अनेक बोलून दाखवली जाते. पण दोन्ही भाऊ एकत्र येणार की नाही, याबद्दल कुणीही खात्रीशीर सांगू शकत नाही. एका वर्तमानपत्राच्या वेबिनार दरम्यान राज ठाकरे यांनाच याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर परमेश्वला ठाऊक असे उत्तर त्यांनी दिले होते. आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या उत्तरावरून त्यांना टोला लगावला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांना राज-उद्धव एकत्र येणार का? यासंदर्भात विचारण्यात आले. संजय राऊत त्यावर बोलताना म्हणाले, राजकारण हे आपले आपण करायचे असते. राजकारणात परमेश्वरावर विसंबून राहणाऱ्या व्यक्तीला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा सदस्य नसतो. तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नसल्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपण आपले करायचे असते, असे म्हणत राऊत यांनी राज यांना टोला लगावला.

एका वेबिनारमध्ये १ जून रोजी महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे संवाद यांनी साधला. राज यांना त्यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला असता त्याला उत्तर देताना राज ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत परमेश्वरालाच ठाऊक, असे म्हटले होते. त्यावर तुम्ही परमेश्वराला मानता का? असा प्रश्न केला. तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असे म्हणालो, असे उत्तर राज यांनी दिले होते.