फेसबुकने दोन वर्षांसाठी निलंबित केले डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट


वॉशिंग्टन – फेसबुकने पुन्हा एकदा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार धक्का दिला आहे. दोन वर्षांसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुक अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्तींच्या फेसबुक खात्यांबाबत फेसबुकची नियमावली आहे. या नियमावलींचे उल्लंघन झाल्याचे कारण देत फेसबुकने ही कारवाई केली आहे.

कंपनीच्या वतीने फेसबुकशी अकाऊंटशी संबंधीत प्रकरणे हाताळण्याची जबबदारी असलेल्या निक क्लेग यांनी माहिती देताना सांगितले की, आज असाधारण प्रकरणात लागू असणाऱ्या नव्या प्रोटोकॉलची आम्ही घोषणा करत आहोत. या प्रोटोकॉलनुसार आम्ही निश्चित कालावधीसाठी कारवाई करण्यास बांधील आहोत. त्यामुळे या प्रोटोकॉलनुसार आम्ही ट्रम्प यांचे खाते दोन वर्षांसाठी निलंबित करत आहोत. ट्रम्प यांचे अकाऊंट 7 जानेवारी 2021 पासून निलंबित करण्यात आले आहे.

वृत्तसंस्था शिन्हुआच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार आयएनएसने म्हटले आहे की, ट्रम्प यांच्यावरील निर्बंधांचे कंपनी पूनर्वमुल्यांकन करेल आणि पुढील निर्णय देईल. ट्रम्प यांच्या अकाऊंटच्या निलंबनाचा कालावधी निश्चित काळापर्यंतच ठेवण्यात येईल की वाढविला जाईल याबाबतची माहिती या निर्णयात दिली जाईल. क्लेग यांनी म्हटले आहे की, आम्ही निश्चित केले आहे की, सार्वजनिक सुरक्षेसाठी मोठी जोखीम असेल तर आम्ही त्यावर निर्बंध अधिक घट्ट करण्याबाबत पुनर्मुल्यांकन कायम ठेऊ.

त्यांनी पुढे म्हटले की, जर निलंबंन हटविण्यात आले, तर ट्रम्प यांच्याकडून भविष्यात नियमांचे पुन्हा उल्लंघन केले जाऊ नये. अन्यथा त्यांचे फेसबुक अकाऊंट कायमस्वरुपी बंद करण्यात येईल. फेसबुकने पुढे म्हटले आहे की, नव्या नियमांनुसार उल्लंघनकर्त्याचे अकाऊंट एक महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत निलंबित केले जाऊ शकते. ही कारवाई युजर्सने कोणत्या प्रकारचे उल्लंघन केले आहे, त्यावर अवलंबून असेल.