सिरममध्ये होणार रशियन स्पुतनिक पाच लसीचे उत्पादन

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने रशियाच्या करोनावरील स्पुतनिक पाच लसीचे उत्पादन करण्याची परवानगी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला दिली असून काही अटींवर ही परवानगी दिली गेल्याचे समजते. भारतात सध्या डॉ, रेड्डीज मध्ये स्पुतनिकचे उत्पादन होत आहे. आता लस उत्पादनाचे लायसन्स असलेल्या सिरमच्या पुणे येथील प्रयोगशाळेत सुद्धा स्पुतनिकचे उत्पादन सुरु होणार आहे.

सिरम इन्स्टिट्यूटने यासाठी मास्कोच्या गेमालीया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपीडेमियोलॉजि अँड मायक्रोबायोटिक्स बरोबर एक करार केला आहे. या कराराच्या प्रती सरकारकडे जमा करण्याची अट सिरमला ड्रग कंट्रोलर विभागाकडून घातली गेली आहे. सिरम मध्ये सध्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन सुरु असून जून मध्ये १० कोटी डोस सरकारला दिले जाणार आहेत. येथे नोवावॅक्स लसीचे उत्पादन सुद्धा सुरु असून चोवीस तास कर्मचारी काम करत आहेत असे संस्थेकडून सांगितले जात आहे.