पुन्हा अवतरणार सुपरसोनिक जेट युग

१९८०-९० च्या दशकात हवाई प्रवासात सुपरसोनिक प्रवासी जेट काँकार्डचा दबदबा होता आणि ही विमाने खुपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाली होती. पण महागडा प्रवास आणि अपघात यामुळे काँकार्ड काही वर्षापूर्वी इतिहासजमा झाली. पण आता पुन्हा एकदा सुपरसोनिक प्रवासी जेटचे युग अवतरत आहे. येत्या पाच ते सहा वर्षात पहिले सुपरसोनिक प्रवासी जेट आकाशात झेप घेणार आहे.

डेनवरची एरोस्पेस कंपनी बूम सुपरसोनिकने अॅव्हेंचर नावाने हे विमान सादर केले आहे. हे विमान ६० हजार फुट उंचीवरून उडेल आणि त्याचा वेग आहे ताशी १३०० मैल. न्युयॉर्क ते लंडन या प्रवासाला सध्या साडेसहा तास लागतात, ते अंतर हे विमान अवघ्या साडेतीन तासात पार करणार आहे. विशेष म्हणजे हे विमान १०० टक्के इको फ्रेंडली इंधनावर चालणार आहे. त्यामुळे कार्बन उत्सर्जन शून्य असेल असे सांगितले जात आहे.

अमेरिकेच्या युनायटेड कंपनीने पहिल्या १५ विमानांची ऑर्डर नोंदविली असल्याचे समजते. २०२५ मध्ये पहिले विमान तयार होईल, २०२६ मध्ये त्याची टेस्ट फ्लाईट होणार आहे आणि २०२९ पासून त्यातून नियमित प्रवासी प्रवास होऊ शकणार आहे.