दुबई वाहतूक पोलिसांना ड्रोन गस्त ठरतेय उपयुक्त

चौकाचौकात उभे राहून हातवारे करून वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस आजही आपल्याला दिसतात. वाहतुकीचा ताण वाढत चालला तसे सीसीटीव्हीच्या मदतीने वाहतूक नियंत्रणाचे काम होऊ लागले त्यालाही बराच कालावधी लोटला आहे. दुबई पोलिसांनी वाहतूक नियंत्रण आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई याबाबत चांगलीच आघाडी घेतली आहे. दुबई मध्ये वाहतुकीवर आकाशातून नजर ठेवली जात असून त्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे.

दुबईची ही ड्रोन सर्व्हिलान्स सिस्टीम अतिशय हायटेक आणि अत्याधुनिक आहे. या ड्रोनचा मदतीने दुबई पोलिसनी २९३३ लोकांना वाहतूक नियम मोडले म्हणून पकडले आणि त्यांच्या कडून नियमानुसार दंड वसूल केला. ड्रोन वापरामुळे एकीकडे पोलिसांचे काम सोपे झाले आहे तर दुसरीकडे नागरिक अधिक सतर्क झाले आहेत असे दिसून येत आहे.

खलीज टाईम्सने या संदर्भात दिलेल्या बातमीनुसार जेथे अरुंद गल्ल्यांमुळे पोलीस वाहतूक पथक पोहोचू शकत नाही अश्याच जागी नव्हे तर सर्व जागी या ड्रोनचा वापर केला जात आहे. या ड्रोनवर हाय रेझोल्युशन कॅमेरे बसविले गेले आहेत. त्यामुळे उंचावरून सुद्धा ते नियम मोडणाऱ्या गाड्यांचे नंबर , गाडीचालकाचा चेहरा रेकॉर्ड करू शकतात. सध्या अशी दोन ड्रोन वापरली जात असून हा प्रयोग अतिशय यशस्वी ठरला आहे.

या ड्रोन गस्ती मध्ये १५९ ड्रग माफियांना व्यवसाय करत असताना पकडले गेले आहे आणि करोना काळात मास्क न वापरणाऱ्या ५१८ लोकांना अचूक टिपून दंड केला गेला आहे असेही समजते.