शेकडो वर्षे जुने जेल बनले अलिशान हॉटेल

तुरुंग म्हटले की नजरेसमोर येतात कोठड्या, चोऱ्या, खून अश्या विविध अपराधात शिक्षा भोगणारे कैदी. काही देशात तुरुंगातून कैद्यांना फारच चांगली वागणूक मिळते तर काही देशात तुरुंगात क्रूरतेच्या सर्व सीमा पार होतात असेही ऐकायला मिळते. काही देशात तुरुंगात कैदी ठेवायला जागा नाही अशी परिस्थिती आहे तर काही देशात गुन्हे दर कमी असल्याने तुरुंग ओस पडले आहेत.

ज्या देशात तुरुंग रिकामे पडले आहेत तेथे जेलचे रुपांतर अलिशान हॉटेल मध्ये करण्याचे उद्योग सुरु झाले असून अशाच एका २४० वर्षे जुन्या तुरुंगाचे रुपांतर अलिशान हॉटेल मध्ये केले गेले आहे. हा तुरुंग इंग्लंडच्या अत्यंत आकर्षक समजल्या जाणाऱ्या बॉडविन भागात असून जॉर्ज तृतीय याच्या काळात म्हणजे २४० वर्षांपूर्वी बांधला गेला होता. १९२० साली तो बंद केला गेला.

या तुरुंगाचे अत्यंत अलिशान हॉटेल मध्ये रूपांतर केले गेले असून येथे ७० खोल्या आहेत. येथे तुम्ही राहिलात तर पूर्वी कधीकाळी या जागेत भयंकर गुन्हेगार होते याची पुसटशी आठवण सुद्धा येणार नाही. इथल्या सुंदर बगीच्यात फिरताना येथे कधी काळी कुणाला फासावर चढविले गेले होते असे सांगून सुद्धा खरे वाटणार नाही. गेली सहा वर्षे या जुन्या इमारतीचे नव्या इमारतीत रुपांतर करण्याचे काम सुरु होते आणि त्यासाठी ५ कोटी पौंड म्हणजे ५१६ कोटी रुपये खर्च केले गेले आहेत.

इंग्लंड मध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या जी ७ समिट साठी येणाऱ्या पाहुण्यांना हे हॉटेल दाखविले जाणार आहे. येथे एका रात्रीचे भाडे २० हजार रुपये आहे. नेदरलंड मध्येही अॅमस्टरडॅम मधील एका तुरुंगाचे असेच अलिशान हॉटेल मध्ये परिवर्तन केले गेले असून या हॉटेलचे नाव आहे,’ हेट असायथिस’