राष्ट्रपतींचे ट्विट हटविणाऱ्या ट्विटरची या देशातून हकालपट्टी

नायजेरियन राष्ट्रपतींननी केलेले ट्विट हटविणे ट्विटरला चांगलेच महागात पडले आहे. नायजेरियन सरकारने ट्विटरवर देशात अनिश्चित काळासाठी बंदी घातली असल्याचे जाहीर केले आहे. देशाच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने आमच्या कार्पोरेटचा अपमान करण्यासाठी ट्विटर प्लॅटफॉर्मचा वापर केल्याचे कारण यासाठी दिले असले तरी त्यामागचे खरे कारण राष्ट्रपतीचे ट्विट हटविणे हेच असल्याचे मानले जात आहे.

दोन दिवसापूर्वी राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकौंटवरून एक ट्विट केले होते ते कंपनीच्या नियमाविरुद्ध असल्याचे कारण देऊन ट्विटरने हटविले होते. या संदर्भात माहिती प्रसारण सहाय्यक सेगुनी अदेयेनी म्हणाले, मी तांत्रिक उत्तर देऊ शकणार नाही. मात्र मंगळवारी सिव्हील वॉर संदर्भात राष्ट्रपतींनी ट्विट केले होते. राष्ट्रपती माजी सैन्य जनरल आहेत. त्यांनी ट्विट मध्ये दक्षिण पूर्व भागातील हिंसेचा उल्लेख केला होता.

ट्विटरने हे ट्विट हटवून पक्षपाती कारवाई केली आहे. बंडखोरांच्या हिंसक संदेशांकडे ट्विटर सोयीस्कर दुर्लक्ष करते. ट्विटरची ही दुटप्पी वर्तणूक खपवून घेतली जाणार नाही असेही सेगुनी यांनी सांगितले.