प्रयोगशाळेत बनले मातेचे दूध

इस्रायलच्या बायोमिल्क नावाच्या स्टार्टअपने महिलांच्या स्तनपेशी पासून प्रयोगशाळेत आईचे दूध बनविण्याचे तंत्र विकसित केले आहे. आईच्या दुधात असणारी सर्व पोषक द्रव्ये या दुधात आहेत फक्त त्यात अँटीबॉडी नाहीत असे स्टार्टअपच्या सहसंस्थापक व चीफ सायन्स ऑफिसर लिल स्ट्रिकलँड यांनी सांगितले.

विशेष म्हणजे असे मातेचे दूध तयार करण्याची प्रेरणा लील यांना स्वतःच्या अनुभवावरून मिळाली. लील यांच्या मुलाचा जन्म अपुऱ्या दिवसांचा झाला होता आणि त्यामुळे त्याला आईचे दूध मिळू शकले नव्हते. बाळासाठी आईचे दूध हे अमृत मानले जाते. बाळाचा सर्वांगीण विकास, पोषण, गंभीर आजारांपासून संरक्षण देण्यात आईचे दूध महत्वाची भूमिका बजावत असते. बाळाचे जन्मतः पचन कमजोर असते पण आईचे दूध त्याला सहज पचते.

आपल्या बाळाला आपण स्तन्य देऊ शकलो नाही या भावनेने आणि अन्य मुलांवर अशी वेळ येऊ नये यासाठी लिल यांनी २०१३ मध्ये प्रयोगशाळेत स्तन पेशी तयार करण्यास सुरवात केली.२०१९ मध्ये खाद्य वैज्ञानिक मिशेल एग्ज यांच्या सहकार्याने लीला यांनी बायोमिल्क नावाची ही स्टार अप सुरु केली. लीला सांगतात, ज्या माता मुलांना आपले दूध देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी काही पर्याय हवा अशी भावना यामागे आहे. ब्रेस्ट फिडींग संपविणे हा त्यामागचा हेतू नाही. येत्या तीन वर्षात हे दूध बाजारात येईल असे समजते.