या महिन्यात लागणार दहावीचा निकाल आणि वेळेत होणार अकरावी प्रवेश


मुंबई : दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर शिक्षण विभागासमोर आता दहावीचा निकाल लावणे आणि अकरावीचे प्रवेश करण्याचे मोठे आव्हान आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात दहावीचे निकाल लावून अकरावीचे प्रवेश वेळेवर करण्याचे शिक्षण विभागाने ठरवलं आहे. शिक्षण विभागाने त्या दिशेने कामाला सुरुवात केली आहे.

राज्य सरकारने दहावी आणि बारावीची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेतला. या परीक्षा रद्द केल्यानंतर आता शिक्षण विभागासमोर दहावीचा निकाल लावण्याचे आव्हान आहे. यंदा दहावीला १६ लाख विद्यार्थी बसले होते. हे विद्यार्थी परीक्षा न देता पुढच्या वर्गात जाणार आहेत. पण दहावीची अंतिम परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली नसली, तरी पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दहावीचे निकालपत्र द्यायचे आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याचे मूल्यमापन नववी आणि दहावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे केले जाणार असून त्या आधारे दहावीचा निकाल तयार केला जाणार आहे. त्यानुसार…

  • नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के वापरून दहावीचा अंतिम निकाल तयार केला जाणार आहे.
  • ३० गुण दहावीचे अंतर्गत मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला देण्यात येणार आहेत.
  • २० गुण गृहपाठ, तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे दिले जाणार आहेत.

अशा पद्धतीने जुलैच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लावून अकरावीचे प्रवेश वेळेवर करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न असणार आहे.

दहावीच्या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढे अकरावीसाठी प्रवेश घेता येणार आहे. पण आपण यापेक्षा चांगले गुण मिळवून चांगल्या महाविद्यालयात प्रेवश मिळवू शकतो, असे ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल त्यांच्यासाठी सीईटीचा पर्याय शिक्षण विभागाने ठेवला आहे. अशा विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात एकच सीईटी घेण्यात येणार आहे. पण ही सीईटी बंधनकारक नसून ऐच्छिक आहे.

ही सीईटी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. सीईटीचे स्वरुप बहुपर्यायी असेल. १०० गुणांची ही सीईटी दोन तांसांची असेल. ही सीईटी अकरावीच्या प्रवेशात एकवाक्यता रहावी आणि सर्वांना समान संधी मिळावी यासाठी घेतली जाणार आहे. एकूणच दहावीची परीक्षा होणार नसली, तरी पुढील निकाल आणि अकरावीच्या प्रवेशाचे सोपस्कार सुरळीत पार पाडण्याचा आव्हान शिक्षण विभागासमोर असणार आहे.