राज्य सरकारने निश्चित केले म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर; असे आहे दरपत्रक


मुंबई – कोरोनापाठोपाठ राज्यात म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळू लागले आहेत. त्यातच राज्य सरकारने केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार म्युकरमायकोसिसला साथरोग कायद्यांतर्गत साथीचा रोग म्हणून समाविष्ट केले असून त्यानुसार निदानपद्धती आणि उपचारपद्धतींसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आता राज्य सरकारला मिळाले आहेत.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यभरात म्युकरमायकोसिसवर उपचार देणाऱ्या रुग्णालयांना या आजाराच्या उपचारांसाठीचे दर निश्चित करून दिले आहेत. कोणत्याही रुग्णालयाला निश्चित दरांपेक्षा जास्त दर आकारता येणार नाहीत. म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी राज्यातील काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारत असल्याचे निदर्शनास आले होते. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे असा प्रकारांना आळा बसणार आहे.

या वर्गवारीनुसार होणार म्युकरमायकोसिस उपचारांची दरआकारणी !
कोणत्या विभागात म्युकरमायकोसिसचा उपचार देणारे रुग्णालय आहे, त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची, शहरांची आणि भागांची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार हे दर आकारले जातील. तसेच, कोणत्या सुविधा दिल्या जात आहेत, त्यानुसार प्रतिदिन कमाल किती दर आकारता येतील, हे सरकारने काढलेल्या आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

वॉर्ड आणि आयसोलेशनची सुविधा

 • अ श्रेणीसाठी ४ हजार रुपये प्रतिदिन
 • ब श्रेणीसाठी ३ हजार रुपये प्रतिदिन
 • क श्रेणीसाठी २ हजार ४०० रुपये प्रतिदिन

आयसीयूशिवाय फक्त व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन –

 • अ श्रेणीसाठी ७ हजार ५०० रुपये प्रतिदिन
 • ब श्रेणीसाठी ५ हजार ५०० रुपये प्रतिदिन
 • क श्रेणीसाठी ४ हजार ५०० रुपये प्रतिदिन

आयसीयू, व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन

 • अ श्रेणीसाठी ९ हजार रुपये प्रतिदिन
 • ब श्रेणीसाठी ६ हजार ७०० रुपये प्रतिदिन
 • क श्रेणीसाठी ५ हजार ४०० रुपये प्रतिदिन

दरम्यान, कोणत्या श्रेणीमध्ये कोणती शहरे किंवा भाग येतात, यासंदर्भात देखील सरकारने जारी केलेल्या आदेशांमध्ये माहिती देण्यात आली आहे.

अ श्रेणी – मुंबई विभाग (मुंबई महानगर पालिका, मीरा भाईंदर महानगर पालिका, ठाणे महानगर पालिका, नवी मुंबई महानगर पालिका, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, उल्हासनगर महानगर पालिका, अंबरनाथ महानगर पालिका, कुळगाव बदलापूर महानगर पालिका, पनवेल महानगर पालिका)

पुणे विभाग (पुणे महानगर पालिका, पुणे कँटोनमेंट, खडकी कँटोनमेंट, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, देहूरोड कँटोनमेंट, देहू सीटी)

नागपूर विभाग (नागपूर महानगर पालिका, दिगडोह सीटी, वाडी सीटी)

ब श्रेणी – नाशिक (नाशिक महानगर पालिका, एकलहरे, देवळाली कँटोनमेंट, भगूर नगरपरिषद), अमरावती महानगर पालिका, औरंगाबाद (महानगर पालिका आणि कँटोनमेंट), भिवंडी (महानगरपालिका आणि खोनी), सोलापूर महानगर पालिका, कोल्हापूर (महानगर पालिका आणि गांधीनगर), वसई-विरार महानगर पालिका, मालेगाव (महानगर पालिका, धायगाव, दरेगाव, सोयगाव, द्याने, मालदा), नांदेड महानगर पालिका, सांगली (सांगली-मिरज कुपवाड महानगर पालिका, माधवनगर)

क श्रेणी – अ आणि ब गट वगळता सर्व भाग

म्युकरमायकोसिस उपचारादरम्यान शस्त्रक्रियांचे दर देखील निश्चित
विशेष म्हणजे म्युकरमायकोसिस आजारात शस्त्रक्रिया हा उपचारातील महत्वाचा घटक लक्षात घेऊन राज्य शासनाने २८ प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठीचा खर्च निश्चित केला असून

 • अ वर्ग शहरांसाठी १ लाख रुपयांपासून ते १० हजार रुपये
 • ब वर्ग शहरांसाठी ७५ हजार रुपयांपासून ते ७५०० रुपयांपर्यंत
 • क वर्ग शहरांसाठी ६० हजार रुपयांपासून ते ६००० रुपयांपर्यंत

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.

पण खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी उपचाराबाबात खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला मंजूरी दिली असून ही अधिसूचना आजपासून ३१ जुलै २०२१ पर्यंत राज्यभर लागू राहणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.