शिक्षण मंत्रालयाच्या विद्यार्थी आणि पालकांसोबतच्या व्हर्चुअल सेशनमध्ये पंतप्रधानांची अचानक एन्ट्री


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची सीबीएसईचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबतच्या बैठकीत चर्चा करत असतानाच सरप्राईज एन्ट्री घेतली. सीबीएसई बारावीच्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबत रद्द झालेली परीक्षा आणि त्याच्या परिणामांबाबत त्यांनी बातचीत केली. 3 जून रोजी दुपारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

सोमवारी (31 मे) उच्चस्तरीय बैठकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या प्रस्तावावर चर्च केल्यानंतर बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतला. देशाच्या कानाकोऱ्यातून या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेक विद्यार्थी आणि त्यांचे पालक बारावीचा निकाल आणि विद्यापीठातील प्रवेशाबाबत काळजीत होते. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत येऊन पालक आणि विद्यार्थ्यांशी बातचीत केली आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही दिली.

पंतप्रधान व्हर्चुअल मीटिंग दरम्यान म्हणाले की, आपल्या भविष्याचा बारावीचे विद्यार्थी कायम विचार करतात. तुम्ही सगळे 1 जूनपर्यंत परीक्षेच्या तयारीत असाल. यावर एका विद्यार्थिनीने उत्तर दिले की, सर, परीक्षा उत्सवाप्रमाणे साजरी करावी, असे तुम्हीच म्हटले होते. त्यामुळे आमच्या मनात परीक्षेची कोणतीही भीती नव्हती.

बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिमाचल प्रदेशातील एका विद्यार्थिनीने बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यासाठी आभार मानले तर मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्तीनिमित्त निंबध लिहिण्यास आणि त्यावर अभ्यास करण्यास सांगितले आहे.