क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून ओडिशातील युवकाच्या उपचारासाठी 65 लाख रुपये जमा


भूवनेश्वर : एअर अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून भूवनेश्वराहून चेन्नईला कोरोनाची लागण होऊन मरणाशी झुंज देत असलेल्या 24 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर अमृत प्रधानला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. परिस्थिती अगदीच बेताची असलेल्या या युवकाच्या मदतीसाठी क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आतापर्यंत 65 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्याच्या उपचारासाठी एकूण 2 कोटी रुपयांची गरज आहे.

भूवनेश्वरच्या एम्समध्ये अमृत प्रधानवर उपचार सुरु आहेत. गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर अमृतच्या फुफ्फुसांमध्ये न्युमोनियाची लागण झाली होती. स्थिती गंभीर होताच त्याला चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करण्याचे ठरवण्यात आल्यामुळे भूवनेश्वर एम्स ते बिजू पटनायक इंटरनॅशनल एअरपोर्ट या दरम्यान ग्रीन कॉरिडॉर तयार करुन केवळ 11 मिनिटांमध्ये पोहचवण्यात आले. तिथून एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने त्याला चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.


अमृत प्रधानची आर्थिक परिस्थिती मध्यमवर्गीय असल्यामुळे काही उत्तम अशी नसल्यामुळे उपचारासाठी लागणारे 2 कोटी रुपये कसे, उभे करायचे असा प्रश्न त्याच्या पालकांसमोर होता. अशावेळी अमृतच्या मित्रांनी सोशल मीडियाच्या मदतीने क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून आतापर्यंत 65 लाख रुपये जमा केले आहेत. आतापर्यंत 5831 लोकांनी या माध्यमातून पैसे दिले आहेत. अजूनही मदतीचा ओघ सुरुच आहे.

अपोलो रुग्णालयामध्ये Extracorporeal membrane oxygenation(ECMO) या मशिनची सोय अमृतचा जीव वाचवण्यासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तरी त्याच्या जीवाला काही धोका नसल्याचे रुग्णालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. आता अमृतचे लंग ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. या सर्वातून त्याला बरे होण्यासाठी दोन महिने तरी लागण्याची शक्यता असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून अमृतच्या अनेक नातेवाईकांनी आणि मित्र परिवाराने आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.