ब्रिटनमधील १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना देण्यात येणार Pfizer ची लस


ब्रिटन – संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच कोरोनाची तिसरी लाट अनेक देशात येणार असल्याचे संकेत तज्ञांनी दिले आहेत. लहान मुले या लाटेत सर्वाधिक बाधित होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत असल्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाचा देखील विचार करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी Pfizer लसीच्या वापरास मंजूरी मिळाली आहे.

Pfizer-BioNTech द्वारे बनवलेली कोरोना लस ब्रिटनने १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी वापरण्यास मान्यता दिली आहे. शुक्रवारी ब्रिटनच्या ड्रग रेग्युलेटरने सांगितले की, सखोल आढावा घेतल्यानंतर असे आढळले की १२-१५ वर्षांच्या किशोरवयीन मुलांसाठी Pfizer-BioNTech ची लस सुरक्षित आहे. फायझरच्या लसीसाठी अमेरिकेने आणि युरोपियन संघानेही असेच मूल्यांकन केले होते.

मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीचे प्रमुख जून रेने म्हणाले, १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांमधील क्लिनिकल चाचण्यांविषयीच्या डेटाचे आम्ही काळजीपूर्वक परीक्षण केले आणि Pfizer-BioNTech सुरक्षित तसेच उपयुक्त असल्याचे आम्हाला आढळले. या व्यतिरिक्त या लसीचे बरेच फायदे आहेत आणि कोणताही धोका नाही.