सलग सहाव्या आर्थिक धोरणांत व्याजदरात कोणतेही बदल केले नाही


मुंबई : आपल्या व्याज दरात भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणताही बदल केला नसून सर्व व्याज दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. तसेच 9.5 टक्के या वर्षीचा विकास दर राहिल असाही अंदाज व्यक्त केला आहे. याआधी तो 10.5 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला होता. आपल्या सलग सहाव्या आर्थिक धोरणांत आरबीआयने व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत.

आरबीआयने कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता महत्वाच्या घटकांमध्ये म्हणजे रेपो दर, रिव्हर्स रेपो दरामध्ये कोणताही बदल न केल्यामुळे सध्याचा रेपो दर हा 4 टक्केच राहील तर रिव्हर्स रेपो दर हा 3.35 टक्के कायम राहिल. तसेच मार्जिनल स्टॅन्डिंग फॅसिलिटी रेट हा 4.25 टक्के आणि बॅंक दर हा 4.25 टक्के असेल.

मॉनेटरी पॉलिसी जाहीर करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात विकास दर हा 9.5 टक्के राहण्याची शक्यता आहे. या आधी तो 10.5 टक्के एवढा राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तसेच या वर्षीचा महागाईचा दर हा 5.1 टक्के राहण्याची शक्यता आहे.

महागाईचा कमी होत असलेला दर आणि मान्सूनची सकारात्मक शक्यता या घटकांमुळे देशाची अर्थव्यवस्था रुळावर येण्याची शक्यताही आरबीआयने व्यक्त केली आहे. आरबीआयने गेल्या वेळच्या आर्थिक धोरणातही आपल्या व्याज दरात कोणताही बदल केला नव्हता. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आता सलग सहाव्यांदा आरबीआयने आपल्या व्याज दरात कोणताही बदल केला नाही.

रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेली बैठक आज समाप्त झाली आहे. त्यानंतर आरबीआयने आपले आर्थिक धोरण जाहीर केले आहे. कोरोनाचा मोठा आर्थिक फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला असून त्यामुळे गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच जीडीपीने निच्चांक गाठला असून तो 2020-21 या वर्षासाठी -7.3 ने घसरला होता. त्या पार्श्वभूमीवर आरबीआयने आपली मॉनेटरी पॉलिसी जाहीर केली आहे.