नवी मुंबई महानगरपालिकेचा गरीब विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी स्तुत्य निर्णय


नवी दिल्ली – विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाला संसाधनांच्या कमतरतेचा फटका बसू नये यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाइल इंटरनेट कनेक्शन विकत घेता यावे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला ५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी लॉकडाऊन लागू झाल्यापासून महापालिकेच्या शाळा बंद असून या दरम्यान ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. पण महानगरपालिकेतील अनेक विद्यार्थी निम्न-मध्यम वर्गातील कुटुंबातील असून त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन घेण्यासाठी पैसे नाहीत.

महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एकूण ४० हजार विद्यार्थी शिकत आहेत. अनेक कुटुंबांकडे संगणक नसून साधा स्मार्टफोन असल्याचे समोर आले आहे. मोबाइल इंटरनेट घेणे अनेक पालकांना परवडत नसल्यामुळे विद्यार्थी ऑनलाइन वर्गात हजेरी लावू शकत नव्हते ज्याचा परिणाम त्यांच्या शिक्षणावर होत होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. लवकरच नवे शैक्षणिक वर्ष सुरु होत असून आणि शाळा सुरु होण्याची शक्यता फारच धूसर असल्यामुळे विद्यार्थ्यांकडे इंटरनेट कनेक्शन असणे खूप गरजेचे झाल्याचेही अधिकाऱ्याने म्हटले आहे.

कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येण्याची शक्यता असून शाळा सुरु होण्याची शक्यता फारच कमी असल्यामुळे आम्ही ऑनलाइन शिक्षण सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी योजना आखत आहोत. पण ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थी आणि पालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून इंटरनेट रिचार्ज त्यापैकी एक असल्याचे समोर आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे.

आम्ही ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक योजना आखत असून इंटरनेट डेटा प्लानची मुलभूत समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही विद्यार्थ्यांना ५०० रुपये देणार आहोत जेणेकरुन किमान तीन महिने त्यांना इंटरनेट मिळेल, असे त्यांनी सांगितले आहे. सध्या महानगरपालिका या पैशांचे वाटप कसे करायचे यासंबंधीच्या प्रस्तावावर काम करत असून पालकांचा खात्यात हे पैसा जमा करण्याचा विचार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

१६०० विद्यार्थ्यांकडे मोबाइल फोनच नसून ही समस्या सोडवण्याचाही महानगरपालिकेचा प्रयत्न असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. इंटरनेट पॅक हे एकमेव उत्तर नसून यामुळे अनेक विद्यार्थी जोडले जातील. ऑनलाइन शिक्षणासाठी आम्ही इतर अनेक योजनांचाही विचार करत असल्याचे अभिजीत बांगर यांनी सांगितले आहे.