मुंबईचा रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल 500 दिवसांवर; आजपासून लसीकरण पूर्ववत


मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव देशासह राज्यात पाहायला मिळत आहे. अशातच दैनंदिन कोरोनाबाधितांची आकडेवारी घसरत असल्याचे पाहायला मिळत आहे. याच दरम्यान देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरीही राज्यातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या लॉकडाऊनदरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यात येणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

मुंबईचा कोरोनाबाधित दुपटीचा कालावधी तब्बल 500 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या वाढीचा दरही 0.13 टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे. काल दिवसभर लस तुटवड्यामुळे बंद असलेले मुंबईतील लसीकरण आज पुन्हा सुरु झाले आहे. मुंबई महानगरपालिकेला कोरोना लसीचे 93 हजार डोस मिळाले आहेत. मुंबईतील महापालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर काल लसीकरण बंद होते. मुंबई महानगरपालिकाने याबाबत ट्वीट करुन माहिती दिली होती. परंतु, आता आजपासून लसीकरण पूर्ववत करण्यात आले आहे. तसेच यासंदर्भातील माहिती महानगरपालिकेने ट्वीट करुन दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यात थैमान घातले आणि मुंबईचा दैनंदिन आकडा अगदी आठ ते दहा हजारांवर जाऊन पोहोचला. पण आता या आकड्यात घट होऊन मुंबईचा दैनंदिन कोरोनाबाधित वाढीचा आकडा हजारांच्या आत आला आहे. त्याचप्रमाणे रुग्णदरवाढीचा दर 6 ते 8 टक्क्यांपर्यंत गेला होता, तो दर आता 0.13 टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. त्याचप्रमाणे मुंबईचा पॉझिटिव्हिटी दरही साधरणतः 3 ते 4 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. रुग्ण वाढीचा दर कमी झालेला आणि रुग्ण दुपट्टीचा कालावधीही वाढला आहे.

गेल्या 24 तासांत मुंबईत 961 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर काल दिवसभरात 897 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,75,193 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16,612 एवढी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 500 दिवसांवर पोहोचला आहे.

धारावीमध्ये काल (गुरुवारी) फक्त एका कोरोनाबाधिताची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. धारावीत सध्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 19 असल्याचे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने घातलेले निर्बंध आणि उपाययोजनांमुळे धारावीसारख्या हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी काल केवळ एका रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत आजवर एकूण 6829 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल दादरमध्ये 6 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. दादरमध्ये आतापर्यंत 9466 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर काल माहिममध्ये 17 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. माहिममध्ये आतापर्यंत 9802 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.