चेन्नईत लसीकरण करा आणि मोफत बिर्याणी मिळवा योजनेला तुफान प्रतिसाद


चेन्नई – सध्या जगभरामध्ये कोरोना लसीकरणासाठी सर्वच स्तरातील लोकांनी सहभागी व्हावे यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची बक्षिसे आणि भेट वस्तू दिल्या जात आहेत. चेन्नईमधील एका गावात असाच एक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. लसीकरणासाठी मासेमारी करणाऱ्यांची लोकसंख्या अधिक असणाऱ्या गावातील नागरिकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने लस घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोफत बिर्याणी देण्याची योजना सुरु केली आहे.

विशेष म्हणजे गावात लस घेणाऱ्या प्रत्येकाला लकी ड्रॉ योजनेमध्ये देखील सहभागी होता येणार आहे. ही योजना एका सेवाभावी संस्थेने सुरु केली असून आश्चर्याची गोष्ट म्हणजे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून लस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

१४ हजार ३०० एवढी मासेमारी हा मुख्य व्यवसाय असणाऱ्या कोवलमची लोकसंख्या आहे. यापैकी ६ हजार ४०० जण लस घेण्यास पात्र आहेत. हे काम एसएटीएस फाऊंडेशनमार्फत केले जात आहे. गावकऱ्यांकडून योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये गावातील केवळ ५४ जणांनी लस घेतल्यामुळेच आम्ही पुढाकार घेऊन फाऊडेशनच्या वतीने लसीकरण मोहीमेला अधिक प्रतिसाद मिळावा म्हणून काय करता येईल आणि लोकांच्या मनातील लसीकरणासंदर्भातील भीती कशी घालवता येईल यासंदर्भात काम करण्यास सुरुवात केल्याचे, या फाऊडेशनचे अधिकारी असणाऱ्या सुंदर यांनी आजतकशी बोलताना सांगितले.

त्यानंतर एसएन रामदास फाऊंडेशन आणि चिराज ट्र्स्टने एसएटीएस फाउंडेशनला मदतीचा हात पुढे केला. या संस्थांच्या स्वयंसेवकांनी लसीचा डोस घेणाऱ्यांना मोफत बिर्याणी देण्याचे ठरवले. तसेच लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसे ठेवण्याचेही ठरवण्यात आले. एसएटीएस फाऊंडेशनच्या सुंदर यांनी या योजनेनंतर प्रतिसाद वाढल्याचे सांगितले आहे.

मागील तीन दिवसांमध्ये ३४५ जणांचे लसीकरण झाले आहे. लकी ड्रॉ योजनेमुळे अनेकजण लसीकरण करुन घेत आहेत. बिर्याणी आणि लकी ड्रॉमध्ये भाग घेता येईल म्हणून लोक पुढे येत असल्याचे सुंदर म्हणाले.

या संस्थानी एक आठवड्याचा लकी ड्रॉ ठेवला. यामध्ये मोफत भेट वस्तू विजेत्यांना देण्यात येतात. यात मिक्सर, ग्राइण्डर, सोन्याची नाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक बम्पर ड्रॉ सुद्धा ठेवण्यात आला असून यामध्ये फ्रीज, वॉशिंग मशीन आणि अगदी स्कूटर जिंकण्याची संधी लस घेणाऱ्यांना आहे. कोवलम गाव कोरोनामुक्त करण्याचा आमचा उद्देश आहे. जवळजवळ सात हजार लोक लसीकरणासाठी पात्र आहेत.

येथे लवकरात लवकर १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा हेतू आहे. हे गाव भारतामध्ये लसीकरणासंदर्भातील आदर्श गाव म्हणून नावारुपास यावे असा आमचा प्रयत्न आहे. संपूर्ण गावातील लोकांचे विचार बदलणे थोडे कठीण असेल. पण बिर्याणी लोकांना आकर्षित करत आहे. येथील लसीकरण केंद्रावरील वातावरण खूपच वेगळे असल्याचे रामदास फाउंडेशनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गौतम रामदास सांगतात.