पॅच चिकटवून घेता येणार करोना लस

करोना लसीकरण जगभर वेगाने सुरु आहे मात्र अनेकांना इंजेक्शनची भीती असते त्यामुळे असे लोक लस घेण्याची टाळाटाळ करतात. ऑस्ट्रेलियातील वैद्यानिकांनी नवीन तंत्र विकसित केले आहे. त्यामुळे विना इंजेक्शन करोना लस घेता येणार आहे. धूम्रपानाची सवय सुटावी म्हणून जसे निकोटीन पॅच वापरले जातात त्याच धर्तीवर करोना लस पॅच वापरले जाणार आहेत.

येथे क्लिक ऑप्शन वापरून करोनाचे हजारो मायक्रोस्कोपिक डोस शरीरात देता येतात. त्यासाठी जे उपकरण वापरले जाते त्यावर करोना लसीचे कोटिंग केले जाते. पॅच मधून त्वचेत घुसून ही लस शरीरात जाते. यामुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती बनते. सिरींज मधून लस देण्यापेक्षा सुद्धा हे पॅच जास्त परिणाम कारक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

विशेष म्हणजे हे पॅच करोनाच्या विविध व्हेरीयंट वर परिणामकारक आहेत. क्वीन्सलंड विद्यापीठातील संशोधक आणि बायोटेक्नोलॉजी फर्मने यासाठी एकत्रित काम केले आहे. डॉ. डेव्हिड मुलर यांच्या मते पॅच मधून शरीरात गेलेली लस जास्त परिणामकारक आहेच शिवाय त्यामुळे लस वाया जाण्याचा धोका राहत नाही. हे पॅच उष्ण हवामानात सुद्धा चांगले राहतात. करोना लस साठविण्यासाठी उणे तापमानात ती ठेवावी लागते. पण हे पॅच ४० डिग्री तापमानात आठ दिवस तर २५ डिग्री तापमानात १ महिना व्यवस्थित राहू शकतात. यामुळे दुर्गम भागात लसीकरण करणे सोयीचे होऊ शकते.