नेटफ्लिक्स जगातील पहिला स्टुडीओ मुंबईत उभारणार

ओटीटी बाजारात तगडी स्पर्धा निर्माण झाली असतानाच या बाजारातील भारताचे वाढते वर्चस्व लक्षात घेऊन डिजिटल मनोरंजन जगात एक नंबरवर असलेली ओटीटी कंपनी नेटफ्लिक्सने त्यांचा जगातील पहिला पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ भारतात, मुंबईत उभारला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीने प्रथमच भारतात गेल्या दोन वर्षात विविध भाषातील कंटेंट तयार करणे आणि खरेदी करण्यासाठी ३ हजार कोटींची गुंतवणूक केल्याचे मान्य केले आहे.

नेटफ्लिक्स जगात ओटीटी मधील आघाडीची कंपनी आहे. अन्य कंपन्यांच्या तुलनेत त्यांचे मासिक तसेच वार्षिक दर अधिक असूनही कंपनीने पहिले स्थान कायम राखले आहे. प्रीमियम ओटीटी कंटेंट मध्ये कंपनी सर्वात पुढे आहे. भारतात या कंपनीने त्यांच्या कामाची सुरवात पाच वर्षापूर्वीच केली आहे पण आजपर्यंत त्यांनी ग्राहक संख्या किंवा गुंतवणूक याविषयी कोणतीही माहिती जाहीर केलेली नव्हती असे समजते.

यंदा प्रथमच कंपनीने अशी आकडेवारी जाहीर केली आहे. कंपनीने कंटेंट साठी केलेल्या ३ हजार कोटींच्या गुंतवणुकीत ४१ वेब सिरीज आणि फिल्म्स समाविष्ट आहेत. मुंबईत कंपनी त्यांचा पहिलाच लाईव्ह अॅक्शन फुल सर्व्हिस पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ उभारत असून हा स्टुडीओ पुढील वर्षी जून पर्यंत कार्यान्वित होणार आहे. यामुळे भारतीय कथा जागतिक पातळीवर पोहोचण्यास मदत होईल असे सांगितले जात आहे.