जगातील सर्वात स्वस्त पल्स ऑक्सिमीटर, किंमत फक्त २९९ रुपये

करोना काळात घरात अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत नव्या काही वस्तू, उपकरणांची भर पडली आहे. त्यातील एक महत्वाचे उपकरण आहे पल्स ऑक्सिमीटर. आज बाजारात अनेक प्रकारचे ऑक्सिमीटर उपलब्ध आहेत. पण जगातील सर्वात स्वस्त पल्स ऑक्सिमीटर बाजारात आणण्याचे काम डीटेल कंपनीने केले असून त्यांनी ऑक्सि १० नावाने केवळ २९९ रुपयात पल्स ऑक्सिमीटर ग्राहकांना उपलब्ध करून दिला आहे.

डीटेल या फोन निर्मात्या कंपनीचा डीटेल प्रो हा हेल्थकेअर ब्रांड आहे. जगातला सर्वात स्वस्त फिचर फोन लाँच करण्याचे रेकॉर्ड या कंपनीच्या नावावर आहे. कंपनीने ऑक्सि-१० भारतीय बाजारात आणला असून कंपनीच्या वेबसाईटवरून तो खरेदी करता येणार आहे. करोना काळात ज्यांना करोना संसर्ग झाला आहे त्याच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वारंवार तपासावी लागते. ऑक्सिमीटर मुळे हे काम घरच्या घरी होऊ शकते. त्यामुळे ऑक्सिमीटरची मागणी वाढली आहे.

डीटेल ऑक्सि १० साठी एलईडी डिस्प्ले दिला गेला आहेच पण यात शट ऑफ सुविधाही दिली गेली आहे. यामध्ये ऑक्सिजनची रक्तातील पातळी समजतेच पण पल्स किती हेही समजते. उपकरण वापरल्यावर ८ सेकंदात काही संकेत मिळाला नाही तर शट ऑफ सुविधा सक्रीय होते. हा ऑक्सिमीटर चालविण्यासाठी बटण आहे.

ग्राहकांना कंपनीने ऑक्सिमीटरची खरेदी केल्यास दोन सुविधा दिल्या आहेत. त्यानुसार दोन डॉक्टर्सचा मोफत सल्ला मिळणार आहे आणि शिवाय सहा महिने वॉरंटी दिली गेली आहे. कंपनीने गेल्याच महिन्यात ७९९ रुपये किमतीचा ऑक्सिमीटर लाँच केला होता. त्यामुळे कंपनीची या बाबतीत स्वतःशीच स्पर्धा आहे असे म्हणता येईल.