धनकुबेर जेफ बेजोसकडे आहेत या खास गोष्टी


जगातील श्रीमंत व्यक्ती याचा अर्थच अगणित संपत्ती, शक्ती आणि प्रतिष्ठा. मनात आणाल ते क्षणात मिळवाल अशी सोय. अमेझोनचे जेफ बेजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत त्यामुळे कित्येकांना ते इतक्या पैशांचे काय करत असतील याची उत्सुकताही आहे. जेफ बेजोस यांच्या मालकीच्या काय खास वस्तू आहेत याची थोडीशी झलक आमच्या वाचकांसाठी.


इतकी श्रीमंत व्यक्ती म्हणजे त्याची अनेक घरेदारे असणार, जमिनी असणार हे ओघाने आलेच. बेजोस त्याला अपवाद नाहीत. त्यांनी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथे नुकतेच एक घर खरेदी केले असून ते या शहरातील सर्वात मोठे घर आहे. पूर्वी हे टेक्स्टाईल म्युझियम होते. बेजोस यांनी हे घर १६० कोटी रुपयांना खरेदी केले असून त्यात ११ बेडरूम्स, २५ बाथरूम्स, ५ लिव्हिंग रूम्स आणि २ लिफ्ट आहेत. त्याचबरोबर बेजोस यांनी न्यूयॉर्क अपस्केल सेन्ट्रल पार्क वेस्ट भागात एकत्र जोडलेले १० हजार चौरस फुट जागेचे तीन फ्लॅट खरेदी केले आहेत.

बेजोस यांच्याकडे बेवर्ली हिल्स मध्ये स्पॅनिश पद्धतीची हवेली असून त्यात ७ बेडरूम्स आहेत. तिची किंमत २ कोटी ५० लाख डॉलर्स आहे. शिवाय त्यांनी १९९८ सालीच वॉशिंग्टन लेक सरोवराकाठी ५ एकर परिसरात दोन घरे घेतली असून त्याची त्यावेळची किंमत १ कोटी डॉलर्स होती. याच भागात मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स याचेही घर आहे.


इतक्या प्रचंड उद्योगाचा कारभार करायचा म्हणजे प्रत्येक क्षण त्या व्यक्तीसाठी महत्वाचा असणारच. बेजोस यांनी टेक्सास मध्ये एक घड्याळ बनविण्याचे काम सुरु केले असून ते १० हजार वर्षे चालू राहील. त्यासाठी बेजोस यांनी २९३ कोटींची गुंतवणूक केली आहे. प्रवासाचा वेळ वाचवा यासाठी बेजोस यांच्या खासगी मालकीचे एक विमान आहे. त्यासाठी त्यांनी ६ कोटी ५० लाख डॉलर्स मोजले असून गल्फस्ट्रीम जी ६५० इआर हे विमान खासगी मालकीच्या सर्वात वेगवान विमानातील एक आहे.


इतकी मालमत्ता असणाऱ्यांना सुरक्षेसाठी रक्षक हवेत तसेच खास कुत्रे हवेत. बेजोस यांनी ट्विटरवर एका रोबो कुत्र्यासह त्यांचा फोटो शेअर करून त्याखाली माय डॉग असे म्हटले होते. या कुत्र्याचे नाव स्पॉट मिनी असून हा रोबो कुत्रा त्यांच्या मालकीचा असावा असा अंदाज आहे. बेजोस यांनी १४१ वर्षे जुने प्रसिद्ध वॉशिंग्टन पोस्ट हे वर्तमानपत्र २३ कोटी डॉलर्सना खरेदी केले आहे तसेच त्यांना अंतराळयान बनवायचे आहे आणि त्यासाठी त्यांनी ब्ल्यू ओरिजिन कंपनी सुरु केली आहे. या कंपनीच्या नावे टेक्सास येथे ३० हजार एकराचे फार्म खरेदी केले गेले आहे.


सिअॅटल येथे अमेझोनचे विशाल कार्यालय आहे. ते तयार करण्यासाठी १० वर्षे लागली आणि ४ अब्ज डॉलर्स खर्च केले गेले. येथे गोल आकाराच्या तीन विशाल घुमटांमध्ये वर्षावन तयार केले गेले आहे. त्यात ४०० विविध प्रकारच्या वनस्पतींची ४० हजार झाडे आहेत. बेजोस यांच्या कार्स बद्दल फारशी माहिती बाहेर आलेली नाही. मात्र त्यांच्याकडे होंडा अकोर्ड आणि शेवरोले ब्लेझर अश्या दोन कार नक्की आहेत.

Leave a Comment