करोना सायकल व्यवसायासाठी ठरले वरदान, अनेक ठिकाणी प्रतीक्षा यादी

वर्षभरापेक्षा अधिक काळ देशात आणि जगात धुमाकूळ घालत असलेल्या करोनाने अनेक व्यापारी आणि व्यावसायिक गोत्यात आले असताना सायकल उद्योगासाठी करोना वरदान ठरला असल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी लॉकडाऊन लागल्यापासूनच सायकलची मागणी वाढू लागली होती ही मागणी यावर्षात अधिक वाढली आहे. अनेक ठिकाणी सायकल साठी दोन ते तीन महिने वेटिंग करावे लागत असल्याचेही दिसून येत आहे.

सायकलीना प्रचंड मागणी येऊ लागल्याने सायकल दुकानदार हैराण झाले असून मेट्रो शहरात सुद्धा सायकलना प्रचंड मागणी येऊ लागली आहे. फिटनेस आणि लहान मुलांच्या सायकलीना खुपच मागणी आहे. या वर्षी १.४५ कोटी सायकल्स विकल्या जातील असा अंदाज आहे. गतवर्षी याच काळात १.२ कोटी सायकल विकल्या गेल्या होत्या.

शहरी भागात आणि मोठ्या शहरात जिम, स्वीमिंग पूल, योग वर्ग करोना मुळे बंद आहेत. त्यामुळे फिटनेस साठी नागरिक सायकलचा वापर अधिक करताना दिसून येत आहे. प्रीमियम आणि लहान मुलांच्या सायकल खास लोकप्रिय आहेतच पण फिटनेस सायकलची मागणी सुद्धा वाढली आहे. गतवर्षीच्या ४० टक्क्यावरून यंदा विक्री ५० टक्क्यांवर गेली आहे. तुलनेने सामान्य सायकलीना कमी मागणी आहे.

भारतात ४ हजार ते ४० हजार अश्या रेंज मधील सायकल जास्त खपतात. मेट्रो सेवा बंद, करोना मुळे सार्वजनिक वाहन वापरण्यास कमी पसंती यामुळेही सर्वसामान्य जनतेत सायकल लोकप्रिय ठरत आहे. सायकल चालविण्याचे फायदे अनेक आहेत. भारतात सायकल व्यवसाय ७ हजार कोटींचा असून जगातील हा दुसरा मोठा बाजार आहे. यंदाच्या वर्षी सायकलीच्या मागणीत २५ टक्के वाढ झाल्याने अनेक ठिकाणी लोकांना हवी ती सायकल मिळविण्यासाठी दोन ते तीन महिने थांबावे लागत असल्याचे समजते.