कनातालच्या शांत, रम्य परिसरात चला पर्यटनाला

करोना मुळे गेले वर्षभर कुठेही बाहेर भटकंती करता आलेली नाही. यामुळे अनेकांना आता भटकंतीचे वेध लागले आहेत. पण करोनाचा धोका अजूनही पूर्ण संपलेला नाही त्यामुळे भटकंतीला यायचे ते सेफ ठिकाण हवे. उत्तराखंड मधील कनातल असे ठिकाण नक्कीच आहे. पर्यटन स्थळ म्हणून ते फारसे प्रसिध्द नाही. त्यामुळे येथे गर्दी मर्यादित असते.

देहरादून पासून ८० किमी आणि जगप्रसिध्द मसुरी पासून अवघ्या १२ किमी वर हे स्थान आहे. सर्व प्रकारचे पर्यटक त्यांच्या आवडीनुसार येथे पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात. म्हणजे कुणाला धार्मिक पर्यटन हवेय, कुणाला साहसी पर्यटन हवेय, कुणाला होम स्टे मध्ये निवांत राहायचे आहे, कुणाला निसर्गाच्या सानिध्यात, शांतपणे राहायचे आहे त्या सर्वाना येथे हवे ते मिळू शकते.

येथील सुरकुंडा देवी मंदिर हे ५२ शक्तीपीठातील एक स्थान असून येथे माता सतीचे मस्तक पडले होते असे मानले जाते. आजूबाजूला निसर्ग सौंदर्य पाहायला दोन डोळे पुरे पडणार नाहीत अशी अवस्था होते. शिवाय शहरी गर्दी नाही त्यामुळे शांततेचा आनंद घेता येतो.

साहसाची आवड असलेले जवळच्या जंगल, डोंगरात ट्रेकिंग, कॅम्पिंग, व्हॅली क्रॉसिंग, रॅपलिंग अश्या विविध प्रकारांचा अनुभव घेऊ शकतात. हिल टॉपचा अनुभव घेऊ शकतात. जंगलातून सफारी करताना विविध पक्षी. प्राणी, कधी कधी कस्तुरी मृग सुद्धा पाहू शकतात. गर्द हिरवाई आणि उंच पहाडाची बर्फाच्छादित शिखरे न्याहाळू शकतात. रात्रीच्या अंधारात कॅम्पिंग करताना चांदण्यांनी खचाखच भरलेले आकाश पाहू शकतात.

येथे होम स्टेची सुविधा चांगली आहे. मातीच्या भिंती असलेले छोटेसे घर स्वयंपाक सुविधेसह तुम्हाला वापरायला मिळते. येथे स्थानिक लोकांशी गप्पा मारताना सूर्यास्त, सूर्योदयाचा आनंद लुटता येतो.