देशात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा वाढला; पण काल दिवसभरात 2887 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण होत असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. देशात आताही दररोज सव्वा लाखाहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 1 लाख 34 हजार 154 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 2887 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 2 लाख 11 हजार 499 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज देशात सलग 21व्या दिवशी कोरोनाची लागण झालेल्यांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. 2 जूनपर्यंत देशात 22 कोटी 10 लाख 43 हजार 693 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 24 लाख 26 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत एकूण 35 कोटी 37 हून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 21.59 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 6 टक्क्यांहून अधिक आहे.

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.18 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 92 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन रुग्णसंख्या 7 टक्क्यांनी कमी झाली आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या यादीत भारत जगभरात दुसऱ्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येतही भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. तर जगात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

तर महाराष्ट्रात काल 15,169 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर काल 29,270 कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 285 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट आहे. राज्यात काल एकूण 2,16,016 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत एकूण 54,60,589 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.54% टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 285 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.67 टक्के एवढा आहे.

गेल्या 24 तासात मुंबईत 925 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1632 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 674296 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 16580 एवढी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 477 दिवसांवर पोहोचला आहे.