मनसुख हिरेण यांच्या अपहरण आणि हत्येसाठी सुनील मानेने वापरली होती मित्राकडून आणलेली कार


मुंबई : आपल्या मित्राकडून पांढऱ्या रंगाची फॉक्सवॅगन कार घेऊन पोलीस निरीक्षक सुनील माने आले होते, जी मनसुख हिरेणच्या अपहरण आणि हत्येसाठी वापरली असल्याचा उल्लेख सुनील मानेला सेवेतून बडतर्फ केल्याच्या आदेशात करण्यात आला आहे. हा आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी जारी केला आहे.

त्यानुसार सुनील मानेने मुख्य आरोपी एपीआय सचिन वाझेकडील मोबाईल फोन आणि सिमकार्ड गोळा केले होते आणि मनसुख हिरेणचे अपहरण करण्यासाठी त्यांचा वापर केला होता. विशेष म्हणजे, मानेने कांदिवली येथील पोलीस निरीक्षक तावडे यांचे नाव वापरुन मनसुख हिरेणला फोन करुन बोलावले होते. घराबाहेर बोलावल्यानंतर सुनील माने मनसुख हिरणला त्या ठिकाणी गेला, जिथे त्याची हत्या करण्यात आली होती.

सुनील मानेला निलंबित करण्यात आलेल्या आदेशामध्ये पुढे म्हटले आहे की, मानेच्या घरातून एनआएला काही संशयास्पद कागदपत्रे मिळाली आहेत. तर एनआयएने सिद्धार्थ सिक्युरीटी अँड डिफेन्स कार्यालयाचीही झडती घेतली, जी सुनील मानेशी संबंधित आहे. या कार्यालयात चार गाड्यांची नोंदणी केलेले कागदपत्रांची झेरॉक्स, तीन अॅग्रीमेंट कॉपीची प्रत, ऑफिस आणि तीन बँकांचे पासबुक सापडले आहेत. त्याचबरोबर सुनील मानेच्या चौकशीमध्ये ठाणे आणि पालघर या जागांचाही उल्लेख आहे, जिथे गुन्ह्याशी संबंधित गोष्टी घडल्याचा संशय एनआएला आहे.

एनआयएच्या तपासात असे देखील समोर आले आहे की, मनसुख हिरेणची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी आपली ओळख लपवण्यासाठी सुनील मानेने मोबाईल फोन आपल्यासोबत नेला नव्हता. तसेच आपला मोबाईल आणि बॅग एका सहकाऱ्याकडे देऊन ती घरी ठेवण्यास सांगितले, जेणेकरुन पुढे जाऊन तपास यंत्रणाची दिशाभूल करणे सोपे होईल.

सुनील मानेने आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काढलेल्या आदेशामध्ये नमूद केले आहे. तसेच एक जबाबदार अधिकारी म्हणून मानेंनी वागायला हवे होते, पण सुनील माने यांनी मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलीन होईल असे कार्य केले, जे अक्षम्य आहे. त्याचबरोबर सुनील मानेचे हे कृत्य एका सराईत गुन्हेगाराप्रमाणे आहे, जे दुर्लक्षित केले जाऊ शकत नसल्यामुळे सुनील मानेला बडतर्फ केल्याचे हेमंत नगराळे यांनी आदेशामध्ये सांगितले आहे.