रणजितसिंह डिसले यांची जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून नियुक्ती


सोलापूर : जागतिक बँकेने ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसलेंची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ही नेमणूक जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता करण्यात आली आहे. जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जागतिक बँकेच्या वतीने ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

याअंतर्गत जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीमध्ये वाढ करण्याच्या हेतूने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे, शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी उद्दिष्टे ठरवण्यात आलेली आहेत.

जगभरातील 12 व्यक्तींची ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डिसले गुरुजींनी सांगितले.

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या आणि ओघाओघाने भारत देशाच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डिसले यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप या नावाने 400 युरोंची ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही शिष्यवृत्ती विद्यापीठ स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यासाठी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रस्ताव पाठवायचे आहेत. या मुलांची निवड बेनव्हेंटोचे महापौर, कॅम्पानिया प्रांताचे शिक्षण अधिकारी करणार असून, पुढील 10 वर्षे 100 मुलांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.