‘त्या’ आक्षेपार्ह ट्वीटवर महापौर किशोरी पेडणेकरांचे स्पष्टीकरण


मुंबई : सध्या ट्विटरवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जोरदार ट्रोल होत आहेत. एका चॅनेलला किशोरी पेडणेकर यांनी दिलेली मुलाखत आपल्या ट्विटर हँडलवर ट्वीट केली होती. त्यात त्यांनी मुंबईसाठी 1 कोटी लसीकरण करण्याचा मानस बोलून दाखवला आणि त्यात 9 कंपन्यांचा उल्लेख केला होता. या ट्वीटखाली एका व्यक्तीने ‘कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले?’ असा प्रश्न विचारला असता, महापौरांनी उद्धट भाषेत उत्तर दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

हा रिप्लाय काही वेळाने डिलीट करण्यात आला. पण आता ट्विटरवर त्याचा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल होत आहे. महापौर किशोरी पेडणेकरांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी ते ट्वीट एका शिवसैनिकाने केले होते आणि त्याची आता हकालपट्टी केल्याचा खुलासा माध्यमांशी बोलताना महापौरांनी केला.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर बोलताना म्हणाल्या की, बीकेसीमध्ये काल (बुधवारी) कार्यक्रम होता. त्यावेळी माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि कार्यकर्ते होते. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही माहीत आहे की, कोणताही कार्यक्रम असेल तर मी माझ्यासोबत मोबाईल ठेवत नाही. मी त्या कार्यकर्त्याकडे मोबाईल दिला. माझा मोबाईल कधीही कोणी घ्यावा आणि चेक करावा, त्याला लॉक नसतो. बसल्या बसल्या त्याने कदाचित माझा मोबाईल हाताळला असावा. त्यावर अनेक आक्षेपार्ह्य ट्वीट असतात, त्याबद्दल शंकाच नाही.

रागाच्या भरात त्याने ते ट्वीट केले. त्यानंतर माझ्या हातात मोबाईल आल्यावर मी चेक केले. माझ्या लक्षात आले की, त्याने ही मोठी चूक केली आहे. कोणी कितीही वाईट वागत असले तरी आपण वागू नये. या मताची मी आहे. तुम्ही एरवीही माझे वर्तन पाहिलेले आहे. मी कधीही असे गैरवर्तन करत नाही. मी ते ट्वीट तत्काळ डिलीट केले. त्या कार्यकर्त्याचीही हकालपट्टी केली आहे.

मलाही याप्रकरणानंतर चांगला धडा मिळाला आहे की, मोबाईल कोणी कितीही जवळचा असला तरी त्याच्या हातात देता कामा नये. आता ठिक आहे, त्याने रागाच्या भरात हे ट्वीट केले. उद्या काहीही होऊ शकते, असेही महापौर म्हणाल्या.