आजपासून 9 जूनपर्यंत रत्नागिरीत लॉकडाऊन; खासगी तसेच सरकारी वाहतूक बंद


रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी यांनी केली आहे. आज अर्थात 3 जूनपासून सुरू होणार हा लॉकडाऊन 9 जूनपर्यंत असणार आहे.

सर्व प्रकारची दुकाने आणि आस्थापने या कालावधीमध्ये बंद राहणार असून केवळ 11 वाजेपर्यंत दुधाच्या होम डिलिव्हरीचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार असून जिल्हा प्रवेशासाठी ई पास अनिवार्य करण्यात आलेला आहे. शिवाय, एसटी, सरकारी आणि खासगी वाहतूक देखील या कालावधीमध्ये बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी एसटी सेवा सुरू राहिल.

तर, शेतकऱ्यांकरिता आणि शेती संबंधित कामकाजाकरिता बँका आणि वित्तीयसंस्था यांचे कामकाज 2 वाजेपर्यंत सुरू राहणार असून यावेळी केवळ 10 टक्के कर्मचारी हजर राहतील. तर पेट्रोल पंप 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार असून महामार्गावरील पंप मात्र 24 तास मालवाहतुकीसाठी सुरू राहतील.