राहुल गांधींनी यामुळे यांनी एकाच दिवसात अनेक नेते, सहकारी, पत्रकारांना केले अनफॉलो


नवी दिल्ली : सध्या आपल्या ट्विटर हॅण्डलमुळे काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी चर्चेत आहेत. एकाच दिवसात पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेते, निकटवर्तीय आणि पत्रकारांना राहुल गांधी यांनी अनफॉलो केले आहे. यानंतर राजकीय अटकळ बांधण्यास सुरुवात झाली आहे. पण राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट रिफ्रेश केले जात असल्यामुळे अनेक अकाऊंट अनफॉलो केल्याचे पक्षाने म्हटले आहे. रिफ्रेशची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा फॉलो केले जाईल, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे.

राहुल गांधी यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन ज्या लोकांना अनफॉलो करण्यात आले आहे, त्यामध्ये त्यांच्या कार्यालयात काम करणारे सहकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. राहुल गांधी यांनी आपले प्रमुख सहकारी केबी बायजू, निखिल आणि निवेदिता अल्वा, कौशल विद्यार्थी यांच्यासह अलंकार सवाई यांना अनफॉलो केले आहे. पण पक्षातील अनेक नेत्यांनी अनफॉलो केल्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तर काही वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर पक्षपात केल्याचा आरोप केल्याचे वृत्त होते. राहुल गांधी यांनी ही कारवाई त्याविरोधात केल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसमध्ये युवा आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये वाद सुरु झाल्याचे हे संकेत असल्याचीही चर्चा आहे. याशिवाय राहुल गांधी यांना असे अनेक नेते फॉलो करत होते, ज्यांचे निधन झाले आहे. यामध्ये तरुण गोगोई, अहमद पटेल आणि राजीव सातव यांचा समावेश आहे.

राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवर फॉलो करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने बदल होत आहे. राहुल गांधी मंगळवारी सकाळी 281 जणांना फॉलो करत होते. यानंतर संध्याकाळी ही संख्या आणखी कमी झाली. या संख्येत बुधवारी संध्याकाळपर्यंत घट होऊन 219 एवढी झाली. पण या दरम्यान राहुल गांधी ट्विटरवर सातत्याने सक्रियही दिसत होते. तर राहुल गांधी यांच्या फॉलोअर्सची संख्या 1.88 कोटी एवढी आहे.

काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट रिफ्रेश केले जात असल्यामुळेच त्यांच्या अकाऊंटवरुन अनेकांना अनफॉलो केले आहे. लवकरच नव्या रणनीतीसह ते परततील आणि नव्या यादीअंतर्गत लोकांना फॉलोही करतील. ज्यांना सध्या अनफॉलो केले आहे, अशा लोकांचाही नव्याने फॉलो करणाऱ्यांमध्ये समावेश असू शकतो.

अनेक नेत्यांना राहुल गांधी यांनी अनफॉलो केले असले तरी त्यांच्या फॉलोअर्सच्या यादीत अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये खासदार मनिकम टागोर, शक्तीसिंह गोहिल आणि ओमन चांडी यांसारखे नेते आहेत. याशिवाय अभिषेक मनु सिंघवी आणि पवन खेडा हे प्रवक्ते आहेत. तसेच तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांच्यासह डीएमकेच्या कनिमोळी यांनाही राहुल गांधी फॉलो करतात.